सिरोंचा/कालेश्वर विशेष प्रतिनिधी दिनांक 21 मे 2026
सिरोंचा मुख्यालयापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेला गोदावरी, प्राणहिता आणि अदृश्य सरस्वतीच्या पवित्र त्रिवेणी संगमावर वसलेल्या #कालेश्वर येथे आजपासून सरस्वती अंत्य पुष्कर सोहळ्याला अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात भव्य प्रारंभ झाला. तेलंगणा सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळ्याचा शुभारंभ राज्याचे मंत्री दुद्धिल्ला श्रीधर बाबू, देवादाय विभागाच्या मंत्री कोंडा सुरेखा तसेच कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पहाटे ५.४३ वाजता कांची पीठाधिपतींच्या हस्ते पवित्र पुष्कर स्नान करण्यात आले आणि त्यानंतर विधिवत मंत्रोच्चारात अंत्य पुष्कर सोहळ्याला लाँचनात्मक सुरुवात करण्यात आली.
#कालेश्वर मुक्तेश्वर स्वामी मंदिर परिसरात पहाटेपासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली होती. “हर हर महादेव” आणि वैदिक मंत्रांच्या घोषात त्रिवेणी संगम परिसर पूर्णपणे भक्तिमय झाला होता. तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड तसेच आंध्रप्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल झाले. पवित्र स्नान करून #कालेश्वर मुक्तेश्वर स्वामींचे दर्शन घेतल्याने पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
यावेळी मंत्री दुद्धिल्ला श्रीधर बाबू यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “सरस्वती अंत्य पुष्कर हा अत्यंत पवित्र धार्मिक सोहळा असून मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंत्री कोंडा सुरेखा यांच्या नेतृत्वात तेलंगणा सरकारने व्यापक नियोजन केले आहे. मागील वर्षी झालेल्या सरस्वती आदि पुष्कराच्या अनुभवाच्या आधारे यंदा कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागांना सतर्क ठेवण्यात आले आहे. हे १२ दिवस अत्यंत पुण्यदायी मानले जातात. या काळात त्रिवेणी संगमात स्नान करून #कालेश्वर मुक्तेश्वर स्वामींचे दर्शन घेतल्यास विशेष पुण्य लाभते.”
या १२ दिवसीय सोहळ्यासाठी राज्य सरकारने तब्बल ३०.६३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. २१ मे ते १ जूनदरम्यान होणाऱ्या या सोहळ्यासाठी ३० ते ४० लाख भाविक #कालेश्वर येथे येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे.
उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन पुष्कर घाट परिसरात चटई व्यवस्था, सावली मंडप आणि ओआरएस पॅकेट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भाविकांच्या वाहतुकीसाठी ९० विशेष शटल बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून #कालेश्वर परिसरातील २३ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल २४५ एकर जागेत सुमारे १ लाख ७० हजार वाहनांच्या पार्किंगची सुविधा उभारण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने घाट परिसर, मंदिर क्षेत्र आणि पार्किंग भागात २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नदी परिसरात एसडीआरएफ पथके, सुरक्षा बोटी, लाईफ रिंग्स आणि विशेष बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय ५० ते १०० प्रशिक्षित गज-ईतगारांची नियुक्ती करण्यात आली आहे, जे सतत नदी परिसरात दक्ष राहणार आहेत.
आरोग्य विभागाकडूनही व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. #कालेश्वर पुष्कर घाट परिसरातील २३ झोनमध्ये विशेष वैद्यकीय शिबिरे उभारण्यात आली असून ३०० डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिकल कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. विविध भागांमध्ये रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या असून महादेवपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला रेफरल हॉस्पिटल म्हणून विकसित करण्यात आले आहे.
भाविकांच्या सोयीसाठी सुमारे ५०० स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. दोन मोठ्या पाणीपुरवठा प्रकल्पांद्वारे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सर्व पार्किंग क्षेत्रांमध्येही पाणी आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. १२ दिवस अखंड वीजपुरवठा राहावा यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून घाट परिसरात एलईडी दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
देवदाय विभागाच्या वतीने #कालेश्वर येथे १.२० कोटी रुपयांच्या निधीतून विशेष संग्रहालय उभारण्यात येत आहे. तसेच नागेंद्र स्वामी मंदिराचे ३० लाख रुपयांच्या खर्चातून पुनर्बांधणी करण्यात आली आहे. पुष्कर सोहळ्यादरम्यान दररोज सकाळी विशेष होम, हवन आणि धार्मिक विधी पार पडणार असून सायंकाळी भव्य गोदावरी आरती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि तेप्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कांची पीठाधिपती श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या हस्ते झालेल्या पहिल्या पुष्कर स्नानाला उपस्थित भाविकांनी अत्यंत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक क्षण म्हणून अनुभवले. विविध मठांचे स्वामीजी, संत-महंत आणि धार्मिक गुरू पुढील १२ दिवसांत #कालेश्वर येथे येऊन पवित्र स्नान आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, मंत्री दुद्धिल्ला श्रीधर बाबू यांनी भाविकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. वाहतूक, पार्किंग आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करून शांततेत दर्शन आणि स्नान करावे, असे त्यांनी सांगितले. #कालेश्वर येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुरक्षित, स्वच्छ आणि समाधानकारक धार्मिक अनुभव देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Tags :
#कालेश्वर #सिरोंचा #सरस्वतीअंत्यपुष्कर #त्रिवेणीसंगम #दुद्धिल्लाश्रीधरबाबू #कोंडासुरेखा #कांचीपीठ #गोदावरीआरती #धार्मिकसोहळा #विदर्भन्यूज24
