सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक 22 मे 2026
सिरोंचा तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या (एमएससीबी) अनागोंदी कारभारामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. “ट्री कटिंग”चे कारण पुढे करत दररोज सकाळी ६ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने जणूकाही पुन्हा एकदा लोडशेडिंगचे दिवस परत आल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, स्थानिक अधिकाऱ्यांकडे वीजपुरवठा नेमका किती वेळ बंद राहणार याबाबत विचारणा केली असता “आम्हालाच टायमिंग माहिती नाही” असे बिनधास्त उत्तर दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे एमएससीबीच्या नियोजनशून्य कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
तालुका मुख्यालयात दररोज विविध गावांमधून शेतकरी, विद्यार्थी व नागरिक बँक कामे, शासकीय कागदपत्रे, झेरॉक्स, ऑनलाईन अर्ज, शैक्षणिक कामे आदी कारणांसाठी येत असतात. मात्र सकाळपासूनच वीजपुरवठा खंडित राहत असल्याने झेरॉक्स दुकाने, ऑनलाईन सेवा केंद्रे, बँका आणि विविध कार्यालये ठप्प होत आहेत. अनेकांना तासन्तास वाट पाहावी लागत असून आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
शेतकरी वर्गालाही याचा मोठा फटका बसत आहे. सध्या अनेक शेतकरी सकाळच्या वेळेत शेताला पाणी सोडण्याचे काम करतात. मात्र वीज नसल्यामुळे मोटारपंप बंद राहत असून पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. आधीच अवकाळी संकट, वाढते खर्च आणि शेतीतील अनिश्चितता यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही समस्या अधिक गंभीर ठरत आहे.
व्यापारी वर्गाच्याही अडचणी वाढल्या आहेत. सकाळच्या वेळेत दुकाने सुरू असली तरी वीज नसल्यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे. काही व्यापाऱ्यांनी तर ग्राहक नसल्यामुळे दुपारपर्यंत दुकाने अर्धवट बंद ठेवण्याची वेळ येत असल्याचे सांगितले. विशेषतः झेरॉक्स, संगणक, मोबाईल सेवा, बँकिंग आणि ऑनलाईन व्यवहाराशी संबंधित व्यवसाय पूर्णपणे ठप्प होत आहेत.
नागरिकांच्या मते, ट्री कटिंगचे काम आवश्यक असले तरी त्यासाठी योग्य वेळेचे नियोजन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. सकाळी ५ ते ९ या वेळेत ट्री कटिंगचे काम पूर्ण करून त्यानंतर नियमित वीजपुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
तालुक्यातील ही गंभीर समस्या लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून नियोजनबद्ध पद्धतीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा येत्या काळात नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहे.
— विदर्भ न्यूज 24………..
