अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक:- 07सप्टेंबर 2026
अहेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुखबिराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या रॉकेट संत्रा देशी दारूच्या तब्बल ३ हजार निपा तसेच ५ लाख १० हजार रुपये किमतीची होंडा सिटी चारचाकी असा एकूण ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान मौजा आलापल्ली येथील श्रीराम चौकापासून सुमारे ७ किलोमीटर पूर्वेकडे ही कारवाई करण्यात आली. अवैधरित्या देशी दारूची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर संबंधित होंडा सिटी कार एमएच ४८ एस ३६९८ थांबवून दोन पंचांच्या समक्ष वाहनाची तपासणी करण्यात आली.
वाहनाच्या डिक्कीची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी केलेल्या मोजणीत एका खाकी रंगाच्या खोक्यात १०० निपा याप्रमाणे एकूण ३० खोके, म्हणजेच तब्बल ३ हजार निपा रॉकेट संत्रा देशी दारू आढळून आली. या दारूची अवैध विक्री किंमत प्रति निपा ८० रुपये प्रमाणे २ लाख ४० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली होंडा सिटी कार देखील पोलिसांनी जप्त केली असून, तिची जुनी वापरती किंमत अंदाजे ५ लाख १० हजार रुपये आहे. दारूसाठा आणि वाहन मिळून पोलिसांनी एकूण ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी अज्ञात आरोपी वाहन चालकाविरुद्ध अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २९६/२०२६, कलम ६५ (अ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर दारूसाठा कोणाकडून आणण्यात आला होता, तो कुठे नेण्यात येत होता आणि या अवैध दारू वाहतुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
या प्रकरणी फिर्याद पोलीस हवालदार क्र. ५०४३ महेश जगपत सडमेक, वय ४३ वर्षे, नेमणूक पोलीस ठाणे अहेरी यांनी दिली. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही मपोहवा क्र. २६६२ वंदना डोनारकर यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार क्र. ५६२ सरजु वेलादी, पोलीस ठाणे अहेरी, करीत आहेत.
अहेरी परिसरात अवैध दारूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा एका चारचाकी वाहनातून वाहून नेला जात असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
