अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक 07सप्टेंबर 2026
अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात अहेरी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ७ लाख ८४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. चंद्रपूर ते आलापल्ली मार्गावरील लभानतांडा परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच संबंधित वाहनचालक वाहन घटनास्थळीच सोडून पसार झाल्याची माहिती समोर आली असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.५० ते दुपारी १.१० वाजताच्या दरम्यान चंद्रपूर ते आलापल्ली मार्गावरील लभानतांडा येथून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर ही कारवाई करण्यात आली. अहेरी पोलिसांच्या पथकाने महिंद्रा XUV 500 क्रमांक MH-04-GJ-4806 या वाहनाची पाहणी केली असता वाहनाच्या मधल्या सीटवर तसेच मागील डिक्कीत मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला.
वाहनातून ९० एमएल क्षमतेच्या रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीच्या एकूण ३४०० निपा आढळून आल्या. या दारूसाठ्याची अंदाजे किंमत २ लाख ७२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याशिवाय १८० एमएल क्षमतेच्या रॉयल स्टॅग कंपनीच्या ४८ काचेच्या बाटल्या, ज्यांची अंदाजे किंमत १२ हजार रुपये आहे, त्याही पोलिसांनी जप्त केल्या.
दारूसाठ्यासोबतच पोलिसांनी संबंधित महिंद्रा XUV 500 वाहन, ज्याची अंदाजे किंमत ५ लाख रुपये आहे, तेही जप्त केले आहे. वाहनाची तपासणी करताना एका पांढऱ्या रंगाच्या लिफाफ्यात पावती क्रमांक ०५९, दिनांक २० ऑगस्ट २०२६ तसेच ‘जबाबदारी पत्र, वाहन विक्री रसीद एवं वाहन डिलीवरी नोट’ असा मजकूर असलेले कागदपत्र आढळून आले. या कागदपत्रावरून सदर वाहन गौरव प्रभाकर माकोडे, रा. समाज मंदिराजवळ, शास्त्री वॉर्ड, हिंगणघाट, जि. वर्धा यांनी खरेदी केल्याचे नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांची कारवाई सुरू असताना वाहनाचा चालक असल्याचे नमूद असलेला गौरव प्रभाकर माकोडे, अंदाजे वय ३० वर्षे, हा वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तो मिळून आला नाही. त्याच्या शोधासाठी पोलिसांकडून पुढील तपास व कारवाई सुरू आहे.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी नितेश लक्ष्मण दाने, वय ३७ वर्षे, यांच्या फिर्यादीवरून अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५०/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण ७ लाख ८४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची नोंद आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार महेश सडमेक करीत असून, कारवाईसंदर्भातील अधिक तपास सुरू आहे. अहेरी परिसरात अवैध दारूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील तपासात या दारूसाठ्याचा नेमका स्रोत, तो कुठे नेण्यात येत होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे, अहेरी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
