अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक 23 सप्टेंबर 2026
अहेरी आगारातून दुर्गम आणि जंगल भागातील गावांना जोडणाऱ्या एसटी बससेवेबाबत धक्कादायक चित्र समोर येत आहे. काल अहेरी आगारातून देचलीपेठाकडे जाणारी एसटी बस रेपनपल्ली परिसरातील घनदाट जंगलात अचानक बंद पडल्याने सुमारे ४० प्रवाशांवर अंधारात रस्त्यावरच तासन्तास थांबण्याची वेळ आली. या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर आल्यानंतर अहेरी आगारातील बसेसची तांत्रिक स्थिती आणि देखभाल व्यवस्था यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अहेरी आगारातून सायंकाळी ६ वाजता जिमलगट्टा मार्गे देचलीपेठाकडे बस रवाना झाली होती. प्रवासादरम्यान बसचा चौथा गिअर अडकल्याने आणि तांत्रिक बिघाड झाल्याने रेपनपल्ली परिसरातील जंगलात बस पूर्णपणे बंद पडली. रात्रीची वेळ, आजूबाजूला घनदाट जंगल आणि जवळपास कोणतीही वस्ती नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
बस बंद पडल्याने महिला, लहान मुले, वृद्ध तसेच इतर प्रवाशांना आपले सामान घेऊन रस्त्यावरच बसून राहावे लागले. सुमारे दोन ते तीन तास प्रवाशांना मदतीची प्रतीक्षा करावी लागल्याची माहिती आहे. रात्रीच्या अंधारात जंगल परिसरात अशा प्रकारे प्रवासी अडकणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.
ही पहिलीच घटना आहे का?
कालच्या घटनेनंतर अहेरी आगारातील एसटी बसेसच्या स्थितीबाबत प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, कधी धावत्या बसचे टायर उडणे किंवा फुटणे, कधी बसच्या छतावरील अथवा बॉडीवरील भाग तुटून पडणे, तर कधी ब्रेकमध्ये बिघाड होणे, अशा तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत.
विशेष म्हणजे अहेरी परिसरातील अनेक एसटी मार्ग हे दुर्गम आणि घनदाट जंगलातून जातात. या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वळणे असून अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी मानवी वस्तीही नसते. अशा परिस्थितीत बसचा ब्रेक फेल होणे, टायर फुटणे किंवा अन्य गंभीर तांत्रिक बिघाड झाल्यास त्याचे परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतात.
त्यामुळे आता प्रश्न केवळ एका बसच्या बंद पडण्याचा राहिलेला नाही. अहेरी आगारातील बसेसची नियमित तांत्रिक तपासणी होते का? वारंवार बिघाड होणाऱ्या बसेस प्रवासी सेवेत का धावतात? जंगल मार्गावर धावणाऱ्या बसेसची विशेष तपासणी केली जाते का? असे अनेक प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.
‘अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?’
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अहेरी आगारातील सर्व बसेसची तातडीने विशेष तांत्रिक तपासणी करण्याची मागणी होत आहे. टायर, ब्रेक, गिअर बॉक्स, स्टेअरिंग, इंजिन, विद्युत यंत्रणा तसेच बसच्या बॉडीची सखोल तपासणी करून दोषपूर्ण बसेस प्रवासी सेवेतून तात्पुरत्या बाजूला काढाव्यात, अशी मागणी आहे.
तसेच जंगल आणि दुर्गम मार्गावर बस अचानक बंद पडल्यास प्रवाशांना तातडीने पर्यायी बस उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे.
आज बस जंगलात बंद पडली आणि प्रवाशांना तासन्तास वाट पाहावी लागली; उद्या टायर उडाला किंवा ब्रेक निकामी झाला तर? एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच उपाययोजना करण्याची वेळ येऊ नये, अशी भावना प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे.
🔴 अहेरी आगारातील एसटी बसेसच्या तांत्रिक स्थितीची तातडीने चौकशी करा!
प्रवाशांच्या जीवाशी खेळ नको; सुरक्षित आणि विश्वासार्ह बससेवा द्या, अशी नागरिकांची मागणी.
विदर्भ न्यूज 24 नेटवर्क | अहेरी
सत्य बातमी… जनतेसाठी… सदैव…
