सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक 23 सप्टेंबर 2026
‘सेव्ह ॲनिमल, सेव नेचर’ हा सामाजिक संदेश घेऊन मूकजीवांच्या संरक्षणासाठी तब्बल २० हजार किलोमीटरची सायकल यात्रा हाती घेतलेले मनचेरियल, तेलंगणा येथील प्राणिप्रेमी संदेश गुप्ता यांचे सिरोंचा येथे आगमन झाले. त्यांच्या या अनोख्या सामाजिक उपक्रमाचे सिरोंचावासीयांनी उत्स्फूर्त स्वागत करून सत्कार केला. प्राणीमात्रांप्रती संवेदना, निसर्गाचे संरक्षण आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा संदेश या यात्रेतून दिला जात आहे.
मनचेरियल, तेलंगणा राज्यातून २० सप्टेंबर २०२६ रोजी या सायकल यात्रेला सुरुवात झाली. तब्बल ३६५ दिवसांचा कालावधी असलेल्या या यात्रेत देशातील १७ शक्तिपीठांना सायकलने भेट देण्याचा संकल्प संदेश गुप्ता यांनी केला आहे. धार्मिक स्थळांच्या दर्शनासोबतच प्रत्येक ठिकाणी प्राणी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणे, हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे.
रस्त्यावर वाहनांच्या धडकेत अनेक मूकजीवांचा मृत्यू होतो. अपघातानंतर त्यांचे मृतदेह बराच वेळ रस्त्यावरच पडून राहिल्याने त्यांच्यावर पुन्हा वाहनांची चाके जाण्याच्या घटना घडतात. ही वेदनादायी परिस्थिती पाहून संदेश गुप्ता यांनी मूकजीवांसाठी काहीतरी करण्याचा संकल्प केला. त्यामुळे यात्रेदरम्यान रस्त्यावर अपघातात मृत्यू झालेल्या प्राण्यांना सुरक्षितपणे बाजूला करून त्यांची योग्य विल्हेवाट व अंत्यसंस्कार करण्याचा उपक्रम राबविला जात आहे.
यासोबतच रस्त्याच्या कडेला, गावांमध्ये आणि प्रवासादरम्यान आढळणाऱ्या मुक्या प्राण्यांना अन्न-पाणी देणे, त्यांच्याप्रती प्रेम आणि दयेची भावना निर्माण करणे, तसेच नागरिकांना प्राणी संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे, अशा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे जनजागृती केली जात आहे. मूकजीवांचे संरक्षण ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असा संदेश या यात्रेतून दिला जात आहे.
संदेश गुप्ता यांचा हा पहिलाच सायकल प्रवास नाही. यापूर्वी त्यांनी १२ ज्योतिर्लिंगांची सायकल यात्रा पूर्ण केली असून, १२ राज्यांमधून सुमारे २७ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. या पूर्वीच्या प्रवासातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारावर आता १७ शक्तिपीठांच्या यात्रेद्वारे प्राणी आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देशभर पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
सिरोंचा येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सिरोंचावासीयांच्या वतीने तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका संघचालक शंकर बुद्धावार, तिरुपती मुद्दाम, चंद्रशेखर माणिकरैतू, सत्यनारायण गुज्जावार यांच्यासह अन्य मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी संदेश गुप्ता यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत त्यांच्या पुढील सायकल यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. हजारो किलोमीटरचा प्रवास स्वतःच्या सोयीसाठी नव्हे, तर मूकजीवांच्या संरक्षणासाठी आणि समाजात संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी केला जात असल्याने या उपक्रमाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
‘प्राणी वाचले तर निसर्ग वाचेल आणि निसर्ग वाचला तर मानवाचे भविष्य सुरक्षित राहील,’ या भावनेतून सुरू असलेली संदेश गुप्ता यांची सायकल यात्रा सिरोंचातून पुढील प्रवासासाठी रवाना झाली. त्यांच्या या उपक्रमातून प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील मूकजीवांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, अडचणीत सापडलेल्या प्राण्यांना मदत करावी आणि निसर्ग संवर्धनात आपले योगदान द्यावे, असा महत्त्वपूर्ण संदेश समोर आला आहे.
