सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक:- 6 ऑक्टोंबर 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिरोंचा तालुक्यातील विविध गावांमध्ये महिला व नागरिकांच्या सहभागातून आयोजित करण्यात येणाऱ्या गरबा, दांडिया तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी शासनाच्या नियमांचे पालन करून मर्यादित ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष श्रीनाथ हनुमंत राऊत यांनी सिरोंचा येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नवरात्रोत्सवात विविध गावांमध्ये महिला व नागरिकांकडून पारंपरिक पद्धतीने गरबा, दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये पारंपरिक गाणी वाजविण्यासाठी ध्वनिक्षेपक अथवा साऊंड सिस्टीमची आवश्यकता भासते. मात्र, सध्या ध्वनीप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या आवाजातील डीजेवर निर्बंध असल्याची आयोजकांना पूर्ण जाणीव असल्याचे राऊत यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
मोठ्या आवाजात डीजे वाजविण्याचा आग्रह नसून, प्रशासनाने निश्चित केलेल्या ध्वनी मर्यादा आणि वेळेच्या चौकटीतच अत्यंत मर्यादित आवाजात साऊंड सिस्टीम वापरण्यास परवानगी द्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
महिलांच्या सहभागातून आयोजित होणारे हे कार्यक्रम सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याचे नमूद करताना, कार्यक्रमांमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही तसेच ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची आयोजकांकडून पूर्ण काळजी घेतली जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
पोलीस प्रशासनाकडून घालून देण्यात येणाऱ्या सर्व नियम, अटी, ध्वनीची निर्धारित मर्यादा आणि वेळेचे काटेकोर पालन करण्यात येईल, अशी ग्वाहीही भाजप तालुकाध्यक्ष श्रीनाथ राऊत यांनी दिली आहे.
त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील नवरात्रोत्सवातील गरबा, दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमांचा सकारात्मक विचार करून, नियमांच्या अधीन राहून मर्यादित आवाजात ध्वनिक्षेपक व साऊंड सिस्टीम वापरण्यास आवश्यक ती परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे.
महिला व नागरिकांच्या सांस्कृतिक उपक्रमांना प्रशासनाने सकारात्मक सहकार्य करावे, अशी अपेक्षाही राऊत यांनी व्यक्त केली आहे.
— विदर्भ न्यूज 24 नेटवर्क
