सिरोंचा विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक :-06ऑक्टोंबर 2026
वाढदिवस म्हटला की मोठा खर्च, जाहिरातबाजी आणि जल्लोष करण्याची प्रथा दिवसेंदिवस वाढत असताना, या प्रथेला फाटा देत वाढदिवसाचा आनंद समाजाच्या उपयोगी आणण्याचा अनोखा संदेश सिरोंचा येथे देण्यात आला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या भाग्यश्रीताई आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त फिजूल खर्च टाळून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. गरजू रुग्णांना मदत, रस्त्यांची दुरुस्ती, श्रमदानातून स्वच्छता, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अशा विविध उपक्रमांमुळे हा वाढदिवस सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला.
भाग्यश्रीताई आत्राम यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता समाजातील गरजू व्यक्तींसाठी काहीतरी करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सिरोंचा येथील कार्यकर्ते, मित्रपरिवार व हितचिंतकांनी वाढदिवसाचा उत्सव समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा केला.
रुग्णालयात रुग्णांना फळे-बिस्कीटांचे वाटप
कार्यक्रमाची सुरुवात ग्रामीण रुग्णालय, सिरोंचा येथे करण्यात आली. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना फळे व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नागरिकांची आस्थेने विचारपूसही करण्यात आली.
याचवेळी एका गरजू गर्भवती महिलेच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. पुढील उपचारासाठी संबंधित महिलेला अन्यत्र रेफर करण्याची आवश्यकता होती. मात्र तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने पुढील उपचारासाठी जाण्याचा खर्च करणेही त्यांना शक्य नव्हते.
ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर वाढदिवसाच्या निमित्ताने संबंधित महिलेला आर्थिक मदत करण्यात आली. या मदतीमुळे तिच्या पुढील उपचाराचा मार्ग काही प्रमाणात सुकर झाला. वाढदिवसाच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीच्या अडचणीच्या वेळी मदतीचा हात देणे, हा सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन रस्त्यावरील खड्डा बुजविला
रुग्णालयातील उपक्रमानंतर आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. पावसामुळे या रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाला होता. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ये-जा करतात. खड्ड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
स्थानिक प्रशासनाकडे केवळ तक्रार करण्याऐवजी प्रत्यक्ष श्रमदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जीएसबी टाकून संबंधित खड्डा बुजविण्यात आला. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी सामाजिक सहभागातूनही काम करता येते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
कन्याका परमेश्वरी मंदिर परिसरातही श्रमदान
कन्याका परमेश्वरी मंदिरासमोरील रस्त्यावरही पावसामुळे काही ठिकाणी खड्डे निर्माण झाले होते. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झुडपे आणि मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडी असल्याने नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणी येत होत्या.
याठिकाणीही श्रमदानातून खड्डे बुजविण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे व झाडी हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे रस्त्याचा मार्ग अधिक मोकळा झाला असून नागरिकांची गैरसोय कमी झाली.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानाची घेतली दखल
सिरोंचा शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शहरातील नागरिकांसाठी दररोज सकाळ-संध्याकाळ स्वच्छतेचे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल वाढदिवसाच्या उपक्रमातून घेण्यात आली.
स्वच्छता कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरित करण्यात आले. या किटमध्ये तांदूळ, डाळ, खाद्यतेल, मीठ, तिखट, बिस्कीट, साबण यांसह दैनंदिन वापरातील विविध वस्तूंचा समावेश होता.
ऊन, पाऊस किंवा प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर किट स्वीकारताना आनंद दिसून आला. त्यांच्या श्रमाचा सन्मान करून त्यांच्यासोबत वाढदिवसाचा आनंद वाटणे, हाच या उपक्रमामागील उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजेलाही दिले प्राधान्य
यानंतर जिल्हा परिषद मुलांची शाळा, सिरोंचा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच फळांचे वाटप करण्यात आले. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळण्यात अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य देण्यात आले.
शैक्षणिक साहित्य आणि फळे मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या सामाजिक उपक्रमाचा विशेष क्षण ठरला.
वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक संदेश
गरजू रुग्णाला आर्थिक मदत, रुग्णांना फळे व बिस्कीटांचे वाटप, सार्वजनिक रस्त्यावरील खड्डे बुजविणे, श्रमदानातून स्वच्छता, स्वच्छता कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अशा विविध उपक्रमांतून भाग्यश्रीताई आत्राम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
“आपला आनंद समाजाच्या उपयोगी आला, तर त्यापेक्षा मोठी वाढदिवसाची भेट दुसरी कोणतीही नाही,” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. वाढदिवस म्हणजे केवळ स्वतःचा आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजातील गरजू व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याची संधीही ठरू शकतो, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी नगरसेवक रंजित गागापुरवार, नगरसेवक इम्तियाज खान, नगरसेविका नुशरत शेख, कृ. उ. बा. समितीचे संचालक कृष्णमूर्ती रिकुला, युवा नेता विजय रंगुवार, राधिका ताई तडकलवार, श्रीजा ताई भंडारी, स्वाती मॅम, मयुर पप्पालवार, राजेश बद्दी, सिद्धिक भाई, इस्माईल दादा भाई, समीर भाऊ अरिगेलवार, सुरेश कंबगोणी, विजय तोट्टा, सुजल कम्मलवार, संदीप गंटा, सुजित मदरबोइना, आदर्श मदेशी, कृष्णकुमार चोक्कामावर, सादिक भाई, श्रीशांत गट्टू यांच्यासह कार्यकर्ते, मित्रपरिवार, हितचिंतक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
