राष्ट्रीय महामार्ग ६३ बंद; हजारो नागरिकांचे हाल – भाजप शिष्टमंडळाची ‘सार्वजनिक बांधकाम विभाग, विशेष प्रकल्प कार्यालय’ला धडक

विदर्भ न्यूज 24
गडचिरोली दिनांक :-07ऑगस्ट 2025
दक्षिण गडचिरोलीतील जॉनच्या तालुक्यातील वडदम पुलिया जवळील मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ मागील २५ जुलैपासून पूर्णतः बंद असल्यामुळे संपूर्ण भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. या बंदीमुळे अंकिसा-आसारअल्ली परिसरातील १५ ते २० गावांतील हजारो नागरिकांना शिक्षण, आरोग्य, शेती व दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बारा ते पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही मार्ग खुला करण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नव्हती, म्हणून अखेर भाजपच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग, विशेष प्रकल्प कार्यालय येथे धडक दिली.
दररोजच्या प्रवासासाठी हजारो रुपयांचा खर्च
या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, महिला, व्यापारी व सामान्य नागरिक प्रवास करत असतात. परंतु महामार्ग बंद असल्यामुळे शासकीय बससेवा पूर्णतः बंद पडली असून खाजगी वाहनांसाठी प्रवासाचा खर्च १०० ते २०० रुपये इतका झाला आहे, जो गोरगरीब कुटुंबांना परवडणारा नाही.
भाजप शिष्टमंडळाची भेट – असिस्टंट इंजिनियर इंगोले यांच्याकडून माहिती
या ताणलेल्या परिस्थितीची गंभीर दखल घेत भाजपचे माजी जिल्हा सचिव संदीप राचर्लावार आणि भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष रवी चकिनारापुवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग, विशेष प्रकल्प कार्यालयात भेट दिली.
यावेळी असिस्टंट इंजिनियर प्रथमेश इंगोले यांनी माहिती दिली की, “आम्ही ३१ जुलै व ७ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या वाहतूक नियंत्रकांना बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पत्र दिले आहे. तसेच, महामार्गावर कोसळलेला भाग दुरुस्त करण्याचे काम उद्यापासून (८ ऑगस्ट) सुरू करण्यात येणार आहे.”
इंगोले यांनी सांगितले की, “डिझाईन अभावी थेट स्थानिक ठेकेदारांमार्फत तात्पुरती कामे केली गेली, तर ती टिकाऊ राहत नाहीत. त्यामुळे शासनाची मान्यता असलेले डिझाईन मागवूनच काम सुरू करणे गरजेचे होते. आता डिझाईन प्राप्त झाले असून काम सुरू होत आहे.”
परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका
यानंतर भाजप शिष्टमंडळाने महाराष्ट्र परिवहन विभागाचे वाहतूक नियंत्रक मेश्राम यांचीही भेट घेतली. त्यांनी सांगितले की, “आजच आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभाग, विशेष प्रकल्प कार्यालयाकडून मार्ग पुन्हा सुरू करण्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे. आमचा पथक तेथे पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवणार आहे. त्यानंतर वाहतूक सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.”
नागरिकांमध्ये संताप; प्रशासनावर आरोप
या मार्गाच्या बंदीमुळे संपूर्ण यंत्रणा कोलमडल्याचे चित्र असून शासनाचे अपयश स्पष्टपणे समोर येत आहे. नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी
या संपूर्ण प्रकरणावरून स्पष्ट होते की वाहतुकीचा प्रश्न केवळ प्रवासापुरता मर्यादित नसून तो शिक्षण, आरोग्य, शेती आणि रोजगार यावर थेट परिणाम करणारा आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाकडे जोरदार मागणी केली आहे की, महामार्गावरील कामे युद्धपातळीवर हाती घ्यावीत आणि वाहतूक तत्काळ सुरू करण्यात यावी.
✍ संपादक – विदर्भ न्यूज 24
www.vidarbhanews24.com
41x9yx