अतिदुर्गम भागात “रन फॉर युनिटी” मॅरेथॉनमधून राष्ट्रीय एकतेचा संदेश!

पातागुडम (ता. सिरोंचा), दि. 31 ऑक्टोबर (विदर्भ न्यूज 24)
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती तसेच पोलीस स्मृती दिनाच्या निमित्ताने आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने “रन फॉर युनिटी – मॅरेथॉन स्पर्धेचे” आयोजन पोलीस स्टेशन पातागुडम येथे करण्यात आले. सकाळी नेमक्या ७.०० वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या मॅरेथॉनमध्ये पातागुडम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १५० ते २०० युवक-युवतींनी जोशात सहभाग घेतला. पोलिसांच्या या उपक्रमामुळे परिसरात देशभक्तीचा आणि सामाजिक ऐक्याचा माहोल निर्माण झाला.
या मॅरेथॉन स्पर्धेत पोलीस स्टेशन पातागुडमचे प्रभारी अधिकारी पो.उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धोत्रे, पो.उपनिरीक्षक मंगेश कोठावळे, जिल्हा पोलीस दलाचे अंमलदार तसेच SRPF चे अधिकारी व अंमलदार यांनीही सक्रीय सहभाग घेत स्पर्धेला अधिक प्रेरणादायी बनविले.
स्पर्धेच्या शेवटी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या युवक-युवतींना वेगवेगळ्या स्वरूपात रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्रे देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले होते.
सदर कार्यक्रमात सर्व सहभागी युवक-युवतींसाठी चहा, नाश्ता तसेच ORS ची उत्तम व्यवस्था पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आली होती. अशा प्रकारच्या सोयीसुविधांमुळे स्पर्धकांचा उत्साह अधिक वाढला.
पातागुडमसारख्या अतिदुर्गम आणि संवेदनशील भागात पोलिसांनी राष्ट्रीय एकतेचा आणि शारीरिक सुदृढतेचा संदेश देणारा उपक्रम राबविणे हे खरंच प्रशंसनीय आणि प्रेरणादायी असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
या उपक्रमातून पोलिसांनी केवळ फिटनेस आणि देशप्रेमाचाच संदेश दिला नाही, तर जनतेशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा आणि समाजात एकतेचे बंध दृढ करण्याचा सुंदर प्रयत्नही केला.




