पातागुडम पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धोत्रे यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांचा प्रशस्तिपत्राने गौरव..
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल (भा.पो.से.) यांच्या हस्ते सन्मानित

गडचिरोली, दि. ३० ऑक्टोबर (विदर्भ न्यूज 24)
अवैध अंमली पदार्थांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गडचिरोली पोलिसांचे प्रयत्न सातत्याने सुरू असताना, पातागुडम पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री. ज्ञानेश्वर धोत्रे यांनी आपल्या पथकासह केलेल्या उल्लेखनीय कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल (भा.पो.से.) यांनी त्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले.
दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी, छत्तीसगड राज्यातून येणाऱ्या ‘कृष्णा ट्रॅव्हल्स’ क्र. सीजी-१६-सीएस-९०९९ या वाहनामधून अवैधरित्या गांजा वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक धोत्रे यांना मिळाली. तात्काळ सतर्कता दाखवत त्यांनी आपल्या पथकासह नाकाबंदी मोहीम राबवून संशयित वाहन थांबवले आणि तपासणी केली असता, वाहनातून सुमारे ४ किलो गांजा सापडला.
या कारवाईत पोलिसांनी एकूण १० लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल, त्यात गांजा आणि वाहन असा माल जप्त केला. त्याचबरोबर गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाणे पातागुडम येथे गुन्हा क्र. ०२/२०२५ नोंदवण्यात आला असून, अंमली पदार्थ व सायकोट्रॉपिक पदार्थ अधिनियम (NDPS) १९८५ अंतर्गत कलम २०(ब) आणि २२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या धाडसी आणि तात्काळ प्रतिसादामुळे गडचिरोली जिल्हा पोलिसांची अंमली पदार्थांविरोधातील मोहिम अधिक बळकट झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी प्रशस्तिपत्र देताना म्हटले की, “धोत्रे यांनी आपल्या पथकासह अवैध अंमली पदार्थ वाहतुकीवर प्रभावी अंकुश लावून अत्यंत प्रशंसनीय कार्य केले आहे. भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.”
ही कारवाई केवळ पोलीस यंत्रणेच्या दक्षतेचे प्रतीक नसून, सीमावर्ती भागातून होणाऱ्या अंमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर प्रभावी नियंत्रणाचे उदाहरण आहे. या कारवाईमुळे पातागुडम पोलीस ठाण्याच्या पथकाचे मनोबल अधिक वाढले असून, जिल्ह्यातील इतर पोलिस दलांसाठीही हे प्रेरणादायी ठरत आहे.



