आरमोरीत भीषण दुर्घटना -हिरो टू-व्हीलर शोरूमची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू, तिघे जखमी….

आरमोरी विशेष प्रतिनिधी दिनांक:-08ऑगस्ट 2025
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात आज सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. मौजा आरमोरी, भगतसिंग चौक येथील हिरो कंपनीच्या टू-व्हीलर गाड्यांच्या शोरूमच्या मागील बाजूची भिंत अचानक कोसळली. या घटनेत सहा जण भिंतीच्या मलब्याखाली दबले, त्यापैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी व प्रशासनाच्या बचाव पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मलबा हटविण्याचे कार्य सुरू केले. अद्यापही काही लोक अडकले असल्याची शक्यता असल्याने बचावकार्य सुरू आहे.
मृतांची नावे:
1. आकाश ज्ञानेश्वर बुराडे (33) रा. निलज, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर 2. तहसिम इस्त्राईल शेख (28) रा. वडसा, जि. गडचिरोली 3. मोहमद हसन अली शेख (32) रा. वडसा, जि. गडचिरोली
जखमींची नावे:
1. दीपक अशोक मेश्राम (23) रा. आरमोरी, जि. गडचिरोली। 2. विलास कवडू मने (50) रा. आरमोरी, जि. गडचिरोली। 3. सौरभ रवींद्र चौधरी (34) रा. मेंढकी, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर
जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय, आरमोरी येथे हलविण्यात आले. त्यापैकी विलास मने व सौरभ चौधरी यांना पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी आरमोरी पोलीस, महापालिका कर्मचारी, अग्निशमन दल व स्थानिक नागरिक बचावकार्य करत आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र अचानक कोसळलेल्या भिंतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने पुढील तपास सुरू केला आहे.
r7a1iq