गडचिरोलीत नवनिर्मित ‘महिला व बाल रुग्णालय, अहेरी’चे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

विदर्भ न्यूज 24 | गडचिरोली प्रतिनिधी दिनांक:-08/11/2025
गडचिरोली : विकासाच्या नव्या पर्वात गडचिरोली जिल्हा झेप घेत असताना आज आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले. जिल्ह्यातील अहेरी येथे नवनिर्मित “महिला व बाल रुग्णालय” या आरोग्यसेवेच्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णालयाचे लोकार्पण आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली येथे संपन्न झाले.
संध्याकाळी ४.१४ वाजता (८ नोव्हेंबर २०२५) या रुग्णालयाचे लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवर, जनप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंचावर गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री आशिष जयस्वाल, माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम, माजी मंत्री राजे अम्रीशराव आत्राम, माजीं खासदार अशोक नेते विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बेदरी , आ. मिलिंद नरोटे डी.एस.पी. संदीप पाटील, जिल्हाधिकारी अनिष्ट पांड्या तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजनाचा विधी पार पडला.
नव्या इमारतीत महिला व बालकांसाठी विशेष उपचार सुविधा, मातृत्व व नवजात शिशू विभाग, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, सोनोग्राफी व नवजात अतिदक्षता विभाग (NICU) यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या रुग्णालयामुळे अहेरी उपविभागातील तसेच आसपासच्या दुर्गम भागातील हजारो महिलांना व बालकांना तातडीची व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळणार आहे.
कार्यक्रमात बोलताना मा. फडणवीस यांनी सांगितले,
> “गडचिरोलीचा सर्वांगीण विकास हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. अहेरीसारख्या दुर्गम भागात आरोग्यसेवेची उपलब्धता वाढविणे हा शासनाचा संकल्प असून या रुग्णालयाच्या माध्यमातून जनतेला दर्जेदार सुविधा मिळतील. ‘विकसित गडचिरोली’ ही कल्पना आता वास्तवात उतरत आहे.”
या सोहळ्यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी, तसेच स्थानिक जनप्रतिनिधी उपस्थित होते. लोकार्पणानंतर परिसरातील महिलांनी व ग्रामस्थांनी फडणवीस यांचे हार्दिक स्वागत करत “गडचिरोलीच्या प्रगतीचा नवा अध्याय” अशी भावना व्यक्त केली.
‘महिला व बाल रुग्णालय, अहेरी’ हे केवळ आरोग्यसेवेचे केंद्र नसून, ग्रामीण महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने उचललेले ऐतिहासिक पाऊल असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
महिला व बाल आरोग्य सेवेसाठी नवे केंद्र
१०० खाटांच्या क्षमतेचे हे नव्याने उभारलेले रुग्णालय आधुनिक उपकरणांनी सज्ज असून महिलांसाठी आणि बालकांसाठी स्वतंत्र विभाग, प्रसूतिगृह, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, नवजात शिशू अतिदक्षता विभाग (NICU), सोनोग्राफी, प्रयोगशाळा आणि २४ तास आपत्कालीन सेवा उपलब्ध आहे. या सुविधेमुळे अहेरी, सिरोंचा, एटापल्ली आणि आसपासच्या ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना तातडीची व दर्जेदार आरोग्यसेवा मिळणार आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा मोठा विस्तार
या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनेक आरोग्य प्रकल्पांचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
त्यामध्ये —भामरागड तालुक्यातील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र, कोटी यांच्या मुख्य इमारतीचे लोकार्पण जरावंडी व ताडगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन वेंगनुर उपकेंद्र, रेगडी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या नवनिर्मित इमारतींचे लोकार्पण
तसेच चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, धानोरा, कुरखेडा, कोरची आणि सिरोंचा या तालुक्यांतील नवनिर्मित सार्वजनिक आरोग्य पथकांचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.



