एलएमईएलच्या संचालकांची तातडीची मदत: पोलिस कर्मचाऱ्याचा प्राण वाचवण्यासाठी स्वतः हेलिकॉप्टर उडवले
गडचिरोलीतील हेडरीत हृदयविकाराच्या झटक्याने गंभीर झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याला नागपूरला दाखल करताना वेळीच उपचार मिळवले....

कोनसरी, दिनांक:-06 ऑगस्ट 2025(विदर्भ न्यूज 24)
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात तैनात असलेल्या पोलिस नाईकाला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने जीव धोक्यात आला होता. मात्र, लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) चे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांनी विलक्षण तत्परता दाखवत स्वतः हेलिकॉप्टर उडवून या पोलिस कर्मचाऱ्याला नागपूरला हलवले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. ही घटना प्रशासन, वैद्यकीय सेवा आणि मानवी संवेदनशीलतेचे प्रेरणादायक उदाहरण ठरते.
पोलिस नाईक राहुल गायकवाड यांना हृदयविकाराचा झटका
२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी, हेडरी पोलिस ठाण्यात तैनात असलेले पोलिस नाईक राहुल साहेबराव गायकवाड (वय ३७) यांना छातीत वेदना जाणवल्याने त्यांनी तातडीने लॉईड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल गाठले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्या ईसीजी मध्ये अँटीरियर लॅटरल वॉल मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजेच हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले.
त्यांना तातडीने ICU मध्ये दाखल करून आवश्यक औषधोपचार सुरू करण्यात आले. मात्र, स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना तत्काळ हृदयरोग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली असलेल्या नागपूरच्या रुग्णालयात हलवणे गरजेचे ठरले.
बी. प्रभाकरन यांचे वेळेचे भान आणि मानवी मूल्यांना प्राधान्य
त्या दिवशीच एलएमईएलचे संचालक बी. प्रभाकरन हे सुरजागड लोहखनिज खाणीच्या दौऱ्यावर हेडरी येथे होते. पोलिस विभागाच्या विनंतीवरून त्यांनी कोणतीही विलंब न करता एलएमईएलच्या मालकीचे खासगी हेलिकॉप्टर तत्काळ उपलब्ध करून दिले.
तत्पूर्वी हेलिकॉप्टर नागपूरहून हेडरी येथील सशस्त्र पोलिस चौकीच्या हेलिपॅडवर दुपारी २:४५ वाजता उतरले. याप्रसंगी सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे, श्री. प्रभाकरन यांनी स्वतः हेलिकॉप्टर पायलट म्हणून उडवले आणि रुग्णासह नागपूरला रवाना झाले.
वैद्यकीय पथकाची दक्षता आणि यशस्वी उपचार
रुग्णासोबत हॉस्पिटलचे अनुभवी नर्सिंग स्टाफही उपस्थित होते. दुपारी ३:४० वाजता हेलिकॉप्टर नागपूर विमानतळावर उतरले, जिथे आधीच ऑरेंज सिटी हॉस्पिटल ची क्रिटिकल केअर अॅम्ब्युलन्स तयार होती. उपचारादरम्यान राहुल गायकवाड यांच्या हृदयातील एक धमनी पूर्णपणे ब्लॉक असल्याचे निष्पन्न झाले.
प्राथमिक उपचारांनंतर ४ ऑगस्ट रोजी यशस्वीरीत्या स्टेंट बसवण्यात आले. उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी रात्री त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

एलएमईएलचा सामाजिक भान आणि गडचिरोलीतील जनतेसाठी बांधिलकी
या घटनेने एलएमईएलचे सामाजिक बांधिलकी आणि गडचिरोलीतील गरजूंप्रती असलेली संवेदनशीलता अधोरेखित केली आहे.
श्री. बी. प्रभाकरन यांच्याकडे विमान आणि हेलिकॉप्टर दोन्हीसाठी पायलट लायसन्स असून त्यांचा १० वर्षांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी स्वतःच्या सर्व बैठकांना स्थगित करत पोलिस कर्मचाऱ्याच्या जीवाला प्राधान्य दिले, याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
-या घटनेचे महत्त्व –
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात हेलिकॉप्टरद्वारे वैद्यकीय मदत मिळणे दुर्मीळ.
बी. प्रभाकरन यांची ही तत्परता अन्य खासगी कंपन्यांसाठी अनुकरणीय आहे.
या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये लॉईड्स संस्थेप्रती विश्वास वृद्धिंगत झाला आहे.