राष्ट्रीय महामार्ग 353C वरील खड्ड्यांवर अनोखे आंदोलन – खड्ड्यांमध्ये धान रोवणी करून संतप्त जनतेचा निषेध

अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक 18 ऑगस्ट 2025
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353C दुरवस्थेमुळे नागरिकांच्या संतापाचा विषय ठरत आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, असमान पृष्ठभाग आणि खराब गुणवत्तेच्या कामांमुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. अपघातांचे प्रमाण वाढल्याने स्थानिक रहिवाशांनी आज अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
जिमलगट्टा फाटा येथे सकाळी 10 वाजता झालेल्या या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी रस्त्यावरील खोल खड्ड्यांमध्ये धानाची रोवणी व वृक्षारोपण करून शासनाचा निषेध व्यक्त केला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य राजू मामीडवार, यशवंत डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते स्नेहदीप आत्राम, शंकर रंगूवार, अरुण वेलादी (सरपंच मरपल्ली), शंकर नैताम (सरपंच अर्कपल्ली), डॉ. साईश उपग्नलावार, नंदेश्वर मेश्राम, शैलेश कोडापे, महेश बोरकुट यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी सरपंच ज्योती मडावी (कोन्जेड) यांनीही प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की –
> “जर दहा दिवसांत खड्डे बुजविण्याची ठोस उपाययोजना झाली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करून रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.”
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या महामार्गाच्या दुरवस्थेमुळे शालेय विद्यार्थ्यांना, रुग्णवाहिकांना तसेच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शासन व संबंधित विभाग याकडे गंभीरतेने पाहात नसल्याने शेवटी नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे.
अनोख्या पद्धतीने धान रोवून केलेल्या या आंदोलनामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून प्रशासनाने तातडीने कामे सुरू न केल्यास जनतेचा संताप उग्र रूप धारण करेल अशी चिन्हे आहेत.
#विदर्भन्यूज24 #NH353C #Protest #Gadchiroli