# स्वातंत्र्यानंतर प्रथमच आंबेझरीसह १५ गावांत बससेवेचा शुभारंभ – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हा

स्वातंत्र्यानंतर प्रथमच आंबेझरीसह १५ गावांत बससेवेचा शुभारंभ

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून दुर्गम भागातील नागरिकांचे स्वप्न झाले साकार; नागरिकांचा व शालेय विद्यार्थ्यांचा जल्लोष, ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झरेवाडा बससेवेचा घेतलेला उल्लेख पुन्हा एकदा चर्चेत

Amazon.in/ONLINE SHOPPING

गडचिरोली विदर्भ न्यूज 24नेटवर्क दिनांक:-18ऑगस्ट 2025

गडचिरोली जिल्ह्याचा विकास प्रवास वेग घेत असून, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या अथक प्रयत्नांनी आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने प्रथमच अतिदुर्गम आंबेझरीसह एकूण १५ गावांसाठी बससेवेचा शुभारंभ झाला. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७९ वर्षांनी बस प्रथमच या भागात दाखल झाल्याने गावकऱ्यांनी जल्लोषात पारंपरिक वाद्य वाजवत, नृत्य करत बससेवेचे स्वागत केले. शालेय विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन “भारत माता की जय” च्या घोषणा देत या ऐतिहासिक क्षणाला संस्मरणीय बनवले.

बस आगमनाने गावात उत्सवाचे स्वरूप

आंबेझरी गावात आज बस दाखल होताच गावकरी आनंदाने थिरकू लागले. स्त्री-पुरुष, लहान मुलं, वयोवृद्ध अशा सर्वांनी एकत्रितपणे ढोल-ताशांच्या गजरात व पारंपरिक गोंड नृत्याने बससेवेचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन घोषणाबाजी केली. गावकरी म्हणत होते – “आज आमचं स्वप्न पूर्ण झालंय, आता आम्हालाही जिल्हा आणि तहसील ठिकाणी पोहोचायला मोठी सोय झाली.”

पोलीस दलाच्या प्रयत्नांना यश

पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा श्री. जगदीश पांडे, पोलीस उपअधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकार झाला. पोस्टे कटेड़ारीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. अजय भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली.

गडचिरोली–चातगाव–धानोरा–येरकड–मुरुमगाव–खेडेगाव–आंबेझरी–मंगेवाडा–जयसिंगटोला–मालेवाडा या मार्गावर सुरु झालेल्या या बससेवेचा लाभ १५ हून अधिक गावांमधील नागरिकांना होणार आहे.

विद्यार्थ्यांना व नागरिकांना मोठा दिलासा

या बससेवेच्या प्रारंभामुळे विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालय व इतर शैक्षणिक केंद्रांमध्ये पोहोचणे आता सुलभ होणार आहे. आतापर्यंत पायपीट करून प्रवास करावा लागणाऱ्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्य सेवा, शासकीय कामकाज आणि बाजारपेठेत जाणे या दृष्टीनेही गावकऱ्यांना प्रवास सुलभ होणार आहे.

विकासाच्या दिशेने गडचिरोली

गडचिरोली पोलीस दलाच्या संरक्षणाखाली गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात विकासाच्या अनेक घडामोडी घडल्या आहेत. आतापर्यंत –५०७ मोबाईल टॉवर उभारणी,४२० कि.मी. रस्त्यांचे बांधकाम,६० पूल उभारणी पूर्ण झाली आहे.

यावर्षी गट्टा (जा.)–गर्देवाडा, कटेझरी–गडचिरोली आणि मरकणार–अहेरी मार्गांवर प्रथमच बससेवा सुरू करण्यात आली. आता आंबेझरीपर्यंत बस पोहोचल्याने या विकास उपक्रमांची नवी कडी जोडली गेली आहे.

मोदींच्या ‘मन की बात’मधील झरेवाडाचा उल्लेख पुन्हा चर्चेत

याआधी गडचिरोली जिल्ह्यातील झरेवाडा गावात प्रथमच बससेवा पोहोचल्याची घटना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या लोकप्रिय कार्यक्रम ‘मन की बात’ मध्ये देशभर सांगितली होती. आज आंबेझरी व परिसरात बससेवा सुरू झाल्याने झरेवाडा बससेवेची आठवण ताजी झाली असून, गडचिरोलीच्या विकास यात्रेला देशभरातून दाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

   — गडचिरोली पोलीस दल आणि राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने झालेला हा ऐतिहासिक उपक्रम केवळ दळणवळणाची सोय निर्माण करणारा नसून, दुर्गम भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्याच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल आहे.

संपादन – विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Sandeep Racharlawar

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker