गडचिरोली पोलिसांचा जीव वाचविणारा धाडसी निर्णय – अंगणवाडी सेविकेचे हेलिकॉप्टरद्वारे भामरागडहून गडचिरोलीला वैद्यकीय स्थलांतर

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक 20 ऑगस्ट 2025
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसला असून कालपासून भामरागडसह तब्बल ११२ गावांचा गडचिरोलीशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. अशा कठीण परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी पुढाकार घेतला.
भामरागड पोलिस ठाणे हद्दीतील मौजा आरेवाडा येथील अंगणवाडी सेविका श्रीमती सीमा बांबोळे यांची प्रकृती गंभीर झाल्याने तातडीने योग्य उपचारांची गरज भासली. याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्यामार्फत पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने पवन हंस हेलिकॉप्टर भामरागडकडे रवाना करण्यात आले.
या धाडसी कारवाईतून सेविका सीमा बांबोळे यांना सुरक्षितपणे गडचिरोली येथे आणण्यात आले असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
ही जीव वाचविणारी मोहीम गडचिरोली पोलिसांनी जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने यशस्वीपणे पार पाडली. या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड, पोलिस ठाणे भामरागडचे अधिकारी-कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी, तसेच पवन हंसचे पायलट डीआयजी श्रीनिवास आणि सहपायलट आशिष पॉल यांचे मोलाचे योगदान राहिले.