गोदावरी काठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा; सिरोंचा तालुक्यातील शाळा–महाविद्यालयांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व तहसीलदार निलेश होनमोरे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

सिरोंचा विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक 19 ऑगस्ट 2025
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यासोबतच तेलंगणा राज्यातील कड्डम प्रकल्प व श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीची पातळी झपाट्याने वाढत असून सिरोंचा उपविभागातील नदीकाठच्या गावांना पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक असल्यास नागरिकांनी तातडीने शासकीय निवारागृहात आश्रय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
गोदावरी नदीवरील ताण
गोदावरी नदीची पाणी वहनक्षमता सुमारे 9 लाख क्युसेक इतकी आहे. सध्या नदीतून 5 ते 6 लाख क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे. मात्र विविध प्रकल्पांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे यात आणखी 6 लाख क्युसेकपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील गोदावरी किनाऱ्यावरील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
यासोबतच वर्धा, वैनगंगा व प्राणहिता नद्यांच्या पाणी पातळीतही सततच्या पावसामुळे वाढ झाली असून या सर्व नद्या गोदावरीत मिळत असल्याने धोका आणखी वाढला आहे.
शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
या परिस्थितीचा विचार करून तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष निलेश होनमोरे यांनी तातडीने आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी सिरोंचा तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
प्रशासन सज्ज
जिल्हाधिकारी पंडा यांनी महसूल, पोलीस, ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन पथके तसेच सर्व संबंधित विभागांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत जिवितहानी होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार सर्व विभागांनी खबरदारीची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. यामध्ये कुठलाही विलंब अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी अथवा विभाग प्रमुख जबाबदार राहतील, असा इशाराही तहसीलदार होनमोरे यांनी आदेशात दिला आहे.