ताटीगुडम येथे खाजगी विहीरीतून गरम पाणी; चुनखडकामुळे झालेल्या रासायनिक अभिक्रियेचा निष्कर्ष*
चुनखडकामुळे झालेल्या रासायनिक अभिक्रियेचा भूशास्त्रज्ञांचा निष्कर्ष

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-12/09/2025
अहेरी तालुक्यातील मौजा ताटीगुडम ग्रामपंचायत कमलापूर येथे एका खाजगी विहीरीतून गरम पाणी येत असल्याची घटना घडली असून ही बाब चुनखडकाच्या रासायनिक अभिक्रियेमुळे होत असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्य”कारी अभियंता विनोद उद्धरवार यांनी स्पष्ट केले आहे.
दिनांक 8 सप्टेंबर रोजी सत्यांना मलय्या कटकु यांच्या विहीरीतून गरम पाणी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या चमूने प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित विहीर सुमारे 20 वर्षे जुनी असून तिचा व्यास 1.30 मीटर व खोली 7.80 मीटर आहे. सहा महिन्यांपूर्वी या विहीरीचे गाळ काढण्यात आले होते. तपासणीदरम्यान विहीरीच्या पाण्यात पांढरे कण आढळले तर सबमर्सीबल पंपावर पांढऱ्या थराचे अस्तित्व दिसून आले. परिसराचा भूशास्त्रीय अभ्यास केला असता येथे चुनखडक (चुनखडी – कॅल्शियम कार्बोनेट) खडक असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर विहीरीचे पाणी, जवळील सार्वजनिक हातपंप व इतर घरगुती विहिरीतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्रयोगशाळेच्या निष्कर्षात गरम पाणी असलेल्या विहीरीच्या पाण्यात कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा तब्बल 923 मि.ग्रॅ./लिटर असल्याचे आढळले.
विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वी गाळ काढल्यामुळे पाण्याचा संपर्क जमिनीखालील चुनखडकातील कॅल्शियम ऑक्साइड शी आला. या खडकाची पाण्यासोबत उष्माक्षेपी रासायनिक अभिक्रिया (एक्झोथर्मिक रिऍक्शन) होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साइड तयार झाले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली. परिणामी विहीरीतील पाणी गरम झाले असल्याचा निष्कर्ष भूशास्त्रीय अभ्यासातून काढण्यात आला असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
पाहणी व प्रयोगशाळा तपासणी
8 सप्टेंबर रोजी सत्यांना मलय्या कटकु यांच्या विहीरीतून गरम पाणी येत असल्याचे समजताच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या चमूने प्रत्यक्ष पाहणी केली.
विहीर सुमारे 20 वर्षे जुनी असून व्यास 1.30 मीटर व खोली 7.80 मीटर आहे.
सहा महिन्यांपूर्वी गाळ काढल्यामुळे पाण्याचा संपर्क जमिनीखालील चुनखडकाशी आला.
तपासणीदरम्यान पाण्यात पांढरे कण तर पंपावर पांढऱ्या थराचे अस्तित्व दिसले.
त्यानंतर विहीरीसह परिसरातील सार्वजनिक हातपंप व इतर विहिरीतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. निष्कर्षानुसार गरम पाणी असलेल्या विहीरीत कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा तब्बल 923 मि.ग्रॅ./लिटर इतकी नोंदविण्यात आली.
उष्णतेमागील शास्त्रीय कारण
भूशास्त्रीय अभ्यासानुसार, गाळ काढल्यामुळे पाण्याचा संपर्क जमिनीतील कॅल्शियम ऑक्साइडशी आला.
या खडकाची पाण्यासोबत उष्माक्षेपी रासायनिक अभिक्रिया (Exothermic Reaction) झाली.
यातून कॅल्शियम हायड्रॉक्साइड तयार झाले व मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली.
परिणामी विहीरीतील पाणी गरम झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या घटनेचा अहवाल सादर करून ताटीगुडम परिसरात भूगर्भातील चुनखडक रचनेवर पुढील वैज्ञानिक अभ्यासाची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे.