दर्जेदार व सुरक्षित शाळा उभारणीसाठी प्रभावी नियोजन करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*
शाळा सुरक्षा समितीच्या बैठकीत कंपाऊंड वॉल, सिसिटिव्ही व दर्जेदार सुविधा उभारण्यावर भर*

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-12/09/2025
शाळांना दर्जेदार स्वरूप मिळावे यासाठी नवीन वर्गखोल्या, किचन शेड, विशेषतः विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहे, सुरक्षेच्या दृष्टीने कंपाऊंड वॉल आणि सिसिटिव्ही यंत्रणा यांना प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या. दर्जेदार व सुरक्षित शाळा उभारणीसाठी शिक्षण विभागांने प्रभावी नियोजन करण्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा शाळा सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील शाळा सक्षम व सुरक्षित करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधी, नियोजन आणि धोरणात्मक बदलांबाबत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज सविस्तर आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार (प्राथमिक) आणि वासुदेव भुसे (माध्यमिक) यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी विचारणा केली की शाळा सुरक्षित करण्यासाठी निधी देण्याच्या लेखाशिर्षात धोरणात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे का, विशेषतः ज्या भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे, तेथे वर्गखोल्या व किचन शेड या वेगळ्या तांत्रिक पद्धतीने बांधता येतील का, यावर तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेण्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत मंजूर निधीतून किती कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत, किती प्रलंबित आहेत आणि त्यामागची कारणे काय आहेत, याचीही माहिती त्यांनी घेतली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी लोकसहभागातून शाळांमध्ये सिसिटिव्ही बसविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली.
बैठकीत समग्रचे कार्यकारी अभियंता रविंद्र भरडकर, प्रशांत ढोंगे, उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर व संबंधित अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
—