सिरोंचा | प्रतिनिधी दिनांक:-19 जानेवारी 2026
सिरोंचा तालुक्यातील सुरायपल्ली (आदीमुत्तापुर) येथे एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली असून, मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या घटनेत मोंडी मल्लय्या अक्कूदारी (वय ४५ वर्षे, व्यवसाय – मजुरी, रा. आदीमुत्तापुर, ता. सिरोंचा) यांचा मृत्यू झाला आहे. तर आरोपी म्हणून त्यांचा मुलगा सनमुखराव मोंडी अक्कूदारी (वय ३० वर्षे, व्यवसाय – मजुरी) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत मोंडी मल्लय्या अक्कूदारी हे सतत दारू पिऊन घरी येत व घरात नेहमी झगडा-भांडण करीत असत. या कारणावरून वडील व मुलगा यांच्यात वारंवार वाद होत होते. या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून आरोपी मुलगा सनमुखराव संतप्त झाला.
याच रागाच्या भरात आरोपीने कशाच्यातरी सहाय्याने वडिलांच्या कपाळावर तसेच डोळ्याच्या डाव्या बाजूला वार केला. यानंतर त्यांचे डोके जोरात बाजेवर आपटले, ज्यामुळे मोंडी मल्लय्या अक्कूदारी गंभीर जखमी झाले.
हल्ला इतका भीषण होता की ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. कुटुंबीयांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र गंभीर जखमांमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सिरोंचा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन सिरोंचा येथे गुन्हा क्रमांक ०९/२०२६ नोंदविण्यात आला असून, आरोपी सनमुखराव मोंडी अक्कूदारी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वंगाटे हे करीत आहेत.
या घटनेमुळे सुरायपल्ली व परिसरात भीती, संताप व शोककळा पसरली असून, सततच्या कौटुंबिक वादातून मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
