दुर्गमतेवर मात; लोकशक्तीचा विजय! पातागुडम–सिरोंचा बससेवा अखेर सुरू…
सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक 19 जानेवारी 2026
“रस्ता होता, पण प्रवास नव्हता…” अशी अवस्था असलेल्या अती दुर्गम पातागुडम गावासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. छत्तीसगड सीमेवर वसलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पातागुडम गावात अखेर एस.टी. महामंडळाची बससेवा सुरू झाली असून, ही केवळ वाहतूक सेवा नसून गावकऱ्यांच्या आशा-आकांक्षांना मिळालेली चालती-बोलती वाट आहे.
ही बससेवा सुरू व्हावी, यासाठी पातागुडम व परिसरातील नागरिकांनी अनेक दिवस सातत्याने मागणी लावून धरली होती. या मागणीला पोलीस प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी दिलेल्या पाठबळामुळे अखेर यश आले. लोकांचा आवाज आणि प्रशासनाची सकारात्मक भूमिका यांचा सुंदर मेळ म्हणजे ही बससेवा.
सिरोंचा ते पातागुडम ही एस.टी. बस सुरू होताच गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ आणि प्रशासनाशी जोडणारी ही बससेवा म्हणजे पातागुडमसाठी विकासाची नवी दारे उघडणारा क्षण आहे.
या ऐतिहासिक बससेवेच्या प्रारंभानिमित्त पातागुडम पोलीस स्टेशनतर्फे बस चालक व वाहक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पातागुडम पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर धोत्रे, PSI मंगेश कोठावळे, PSI स्वाती बाष्टेवाड, ASI रामटेके, सरपंच मल्लेश दुर्गम, सीडाम सर तसेच इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
एस.टी. महामंडळाने भविष्यात या मार्गावर आणखी बस फेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले असून, त्यामुळे गावकऱ्यांच्या अपेक्षा आणखी बळावल्या आहेत.
आज पातागुडमपर्यंत बस पोहोचली आहे, उद्या विकासही पोहोचेल—हा विश्वास या बससोबत गावात दाखल झाला आहे.
दुर्गमतेवर मात करत पुढे जाण्याचा हा प्रवास, पातागुडमच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल.
आतापर्यंत पोलिसांकडून नेहमी उल्लेखनीय कामगिरी केल्या जात असतात त्याच्या नंतर उल्लेखनीय कामाची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे
आज पातागुडमपर्यंत बस पोहोचली आहे, उद्या विकासही पोहोचेल—हा विश्वास या बससोबत गावात दाखल झाला आहे. दुर्गमतेवर मात करत पुढे जाण्याचा हा प्रवास, पातागुडमच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल.
विशेष म्हणजे, यापूर्वीही पातागुडम पोलीस प्रशासनाने दुर्गम भागात जनतेच्या सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर नेहमीच उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्याच कार्याची ही पुढची कडी ठरत असून, बससेवा सुरू करून पोलिसांनी पुन्हा एकदा ‘वर्दी म्हणजे फक्त कायदा नाही, तर विकासाचाही आधार’ हे सिद्ध केले आहे. या लोकाभिमुख भूमिकेची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
