सिरोंचा (जि. गडचिरोली) दिनांक एक फेब्रुवारी 2026
हिंदू समाजाची संघटनशक्ती अधिक दृढ करणे, सनातन संस्कृती व सनातन धर्माचे जतन करणे आणि सामाजिक एकतेला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने सिरोंचा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे सम्मेलन शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सिरोंचा येथील क्रीडा संकुल प्रांगणात संपन्न होणार आहे. या सम्मेलनाच्या माध्यमातून हिंदू समाजात वैचारिक जागृती निर्माण करून एकसंधतेचा संदेश देण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे.
सम्मेलनाची सुरुवात सकाळी ९ वाजता भव्य कलश यात्रेने होणार असून ही यात्रा श्री अय्यप्पा मंदिर, सिरोंचा येथून प्रारंभ होईल. या यात्रेत महिलांनी मंगळ वेशात आणि नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कलश यात्रेमुळे संपूर्ण शहरात भक्तीमय आणि उत्सवी वातावरण निर्माण होणार आहे.
या भव्य हिंदू सम्मेलनास अयोध्या येथील प.पू. विश्वब्रम्ह श्री श्री श्री पुज्यवीर धर्मजा स्वामीजी यांचे पावन आशीर्वचन लाभणार असून त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त होणार आहे. तसेच तेलंगाना प्रांतातील ग्रामविकास प्रांत संयोजक व माजी प्राचार्य श्री जिन्ना सत्यनारायण रेड्डीजी हे विशेष मार्गदर्शन करणार आहेत. समाज संघटन, सांस्कृतिक जतन आणि ग्रामविकासाच्या दृष्टीने त्यांचे मार्गदर्शन उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
या सम्मेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर येथील सहप्रांत प्रचारक श्री परिक्षितजी जावळे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, हिंदू समाजाची भूमिका, संघटनाचे महत्त्व आणि राष्ट्रनिर्मितीतील सामाजिक योगदान या विषयांवर ते सखोल मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या विचारांमुळे युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्यंकटस्वामी पोलमपल्ली गुरुस्वामी यांनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली असून सकल हिंदू समाज हे या सम्मेलनाचे आयोजक आहेत. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसाद वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या भव्य हिंदू सम्मेलनात अधिकाधिक हिंदू बांधवांनी सहभागी होऊन समाज संघटन व संस्कृती रक्षणाच्या या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
