नवीन पोमकें बिनागुंडात महाजनजागरण मेळावा, वांगेतुरी पोस्टेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन; शौर्यपदक व वेगवर्धित पदोन्नतींचा गौरव
गडचिरोली प्रतिनिधी विदर्भ न्यूज २४ 01 फेब्रुवारी 2026 महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांनी दि. 31 जानेवारी 2026 रोजी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करत अतिसंवेदनशील आणि अतिदुर्गम भागातील नव्याने स्थापन झालेल्या पोलीस मदत केंद्र बिनागुंडा येथे भेट दिली. भामरागड उपविभागांतर्गत दि. 24 जानेवारी 2026 रोजी स्थापन झालेल्या या पोमकेंच्या माध्यमातून सुरू असलेल्या विशेष अभियानाची पाहणी करत त्यांनी अधिकारी व अंमलदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, पोलीस दलाचा लोकाभिमुख आणि विकासाभिमुख चेहरा समोर आणणारा भव्य महाजनजागरण मेळावा. पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत आयोजित या मेळाव्यास पोलीस महासंचालक सदानंद दाते, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यात बिनागुंडा हद्दीतील 500 हून अधिक नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. उपस्थित नागरिकांना स्प्रे पंप, स्वयंपाकाची भांडी, वाजंत्री साहित्य, शिलाई मशिन, ब्लँकेट, लोवर-टीशर्ट, धोतर, घमेले, महिलांसाठी साड्या व चप्पल, तर शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकल, स्कूल बॅग, पेन, नोटबुक, क्रिकेट किट, व्हॉलीबॉल व नेट, कंपास, कपडे, चॉकलेट व बिस्किटे यांचे वाटप करण्यात आले.
मेळाव्याचे खास आकर्षण ठरले विनोबा आश्रम शाळा, बिनागुंडा येथील दुसरीत शिकणारा आदित्य पोदाडी याचे महाराष्ट्र गीताचे सुरेख सादरीकरण, ज्याने उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना पोलीस महासंचालक सदानंद दाते म्हणाले,
“नवीन पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दल नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवेल. या अतिदुर्गम भागात लवकरच रस्ते, आरोग्य सेवा व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. पोलीस दल नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”
यानंतर भोजनप्रसंगी मा. पोलीस महासंचालकांनी सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी व जवानांसोबत एकत्र भोजन करत त्यांचे मनोबल उंचावले.
वांगेतुरी पोस्टेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन
या दौऱ्यादरम्यान मा. पोलीस महासंचालक सदानंद दाते व अपर पोलीस महासंचालक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या हस्ते पोलीस स्टेशन वांगेतुरी येथील सर्व सोयी-सुविधांनी युक्त नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
या इमारतीमुळे अतिदुर्गम भागात कार्यरत पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शौर्याचा गौरव, कर्तृत्वाला सलाम
यानंतर पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात कसनासूर–बोरीया येथे माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या 31 पोलीस अधिकारी व अंमलदारांना शौर्यपदक प्रदान करून प्रशस्तिपत्र देण्यात आले.
तसेच, उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे 05 पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली. या सर्वांचा मा. पोलीस महासंचालकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी जवानांशी संवाद साधताना पोलीस महासंचालक सदानंद दाते म्हणाले,
“गडचिरोलीत कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांचे बलिदान सदैव स्मरणात राहील. कठीण परिस्थितीतही मोठे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून प्रामाणिकपणे काम करणे हीच खरी सेवा आहे.”
मान्यवरांची उपस्थिती
या सर्व कार्यक्रमांना अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान) संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र निसार तांबोळी, पोलीस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उप-महानिरीक्षक अनिल कुमार, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुलराज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे, उपविभागीय अधिकारी अमर मोहिते, योगेश रांजणकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.