गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक 29 मार्च 2026
गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली-चामोर्शी मार्गावर रविवारी रात्री एक हृदयद्रावक अपघात घडला असून, लग्नसमारंभ आटोपून परतणाऱ्या वरातीतील स्कॉर्पिओ वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुरुड-कढोली गावादरम्यान नाल्याजवळ हा अपघात घडला. स्कॉर्पिओ वाहनात तब्बल १६ प्रवासी प्रवास करत होते. रामपूर येथून लग्न समारंभ आटोपून भाडबिडी मोकासा या दिशेने परतताना, समोरून येणाऱ्या त्रिवेणी अर्थमुवर्सच्या प्रवासी ट्रॅव्हल्सशी स्कॉर्पिओची समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडकेची तीव्रता एवढी जबरदस्त होती की स्कॉर्पिओ वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले आणि प्रशासनालाही घटनेची माहिती देण्यात आली.
जखमींना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारासाठी नेत असतानाच दोघांचा वाटेत मृत्यू झाला, तर उर्वरित जखमींवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटनेमुळे लग्नाच्या आनंदावर क्षणात दुःखाचे सावट पसरले. ज्या कुटुंबात काही तासांपूर्वी मंगलाष्टकांचा गजर होता, त्याच कुटुंबावर आता शोककळा पसरली आहे. गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांकडून प्रशासनाने रस्ते सुरक्षेबाबत अधिक ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी वाहनांचा वेग, रस्त्याची स्थिती आणि चालकांची निष्काळजीपणा या सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.
📌 विदर्भ न्यूज 24 — सत्य, वेग आणि विश्वास
