सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक 29 मार्च 2026
सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर आज सायंकाळी एक गंभीर अपघात घडला असून दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोघेजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातून परत येत असताना अरुण पोचम तोरैम (वय १८ वर्ष, रा. नंदीगाय) आणि राहुल बिनीवाय सिडाम (रा. पुसुकपल्ली) हे दोघे दुचाकीने सिरोंचा कडे येत होते. त्याचवेळी राजाराम चंद्रया अरिगेला (वय ५५ वर्ष, रा. नगरम) हे आपल्या सिरोंचा येथून स्वगावी नगरमकडे परत जात होते.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील प्राणहिता हॉटेलसमोर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की राजाराम अरिगेला यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती राजाराम अरिगेला यांना मृत घोषित केले.
या अपघातात जखमी झालेले अरुण तोरैम व राहुल सिडाम यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी तेलंगणात हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची नोंद सिरोंचा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून प्रभारी पोलिस अधिकारी मारुती नंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वेग आणि निष्काळजीपणा हे संभाव्य कारण असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
