सिरोंचा विदर्भ न्यूज 24 विशेष प्रतिनिधी दिनांक 22 मे 2026
अतिदुर्गम, अविकसित आणि एकेकाळी नक्षलप्रभावित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील पातागुडम परिसरात पोलीस विभाग केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरता मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. पोलीस स्टेशन पातागुडमच्या वतीने मौजा रायगुडम येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विहिरीसाठी नवीन पाण्याची मोटार स्वखर्चातून उपलब्ध करून देण्यात आली.
गावातील सार्वजनिक विहिरीवर बसविण्यात आलेली जुनी मोटार अचानक बंद पडल्याने संपूर्ण गावासमोर पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट उभे राहिले होते. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे नागरिकांना दूरवरून पाणी आणण्याची वेळ आली होती. ही अडचण लक्षात येताच पोलीस स्टेशन पातागुडमचे प्रभारी अधिकारी PSI ज्ञानेश्वर धोत्रे, PSI मंगेश कोठावळे, PSI स्वाती बाष्टेवाड आणि पोलिस अंमलदारांनी तातडीने पुढाकार घेत स्वतःच्या स्वखर्चातून नवीन मोटार उपलब्ध करून दिली.
या उपक्रमामुळे रायगुडम गावातील पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत झाला असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. गावकऱ्यांनी पोलीस विभागाचे मनापासून आभार मानत “पोलीस म्हणजे केवळ सुरक्षा नव्हे तर संकटात धावून येणारा आधार” असल्याची भावना व्यक्त केली.
विशेष म्हणजे, पातागुडम पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी यापूर्वीही या अतिदुर्गम भागात अनेक विकासात्मक आणि सामाजिक उपक्रम राबवत आले आहेत. गावांमध्ये स्वच्छता अभियान, आरोग्य जनजागृती, युवकांना मार्गदर्शन, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, तसेच स्थानिकांच्या सहभागातून विविध लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्यामुळे पोलीस आणि ग्रामीण नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक मजबूत होत आहे.
एकेकाळी भीती आणि दहशतीच्या छायेत असलेल्या या भागात आता पोलीस विभाग लोकांच्या विकासाचा भागीदार बनत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. “जनतेसाठी पोलीस” ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करत पातागुडम पोलीस स्टेशन सामाजिक बांधिलकीची नवी ओळख निर्माण करत आहे.
सदर उपक्रमात PSI ज्ञानेश्वर धोत्रे, PSI मंगेश कोठावळे, PSI स्वाती बाष्टेवाड यांच्यासह पोलिस अंमलदार मनोज नैताम, सुधीर पोकला, शुभम वैद्य व इतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी या कार्याचे विशेष कौतुक करत पोलीस विभागाबद्दल समाधान व्यक्त केले.
Tags :#Gadchiroli #PatagudamPolice #Raygudam #SocialInitiative #जनतेसाठीपोलीस #VidarbhaNews24 #PoliceForPeople #CommunityPolicing #GadchiroliPolice #WaterCrisis #NaxalAffectedArea #PositiveNews
“जनतेसाठी पोलीस”ची जिवंत प्रचिती : पातागुडम पोलिसांचा रायगुडम ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोटार भेट उपक्रम
