# आरडा गाव पुन्हा सज्ज : भक्ती, परंपरा आणि वैभवाने उजळणार श्री मल्लिकार्जुन स्वामी यात्रा महोत्सव… – VIDARBHANEWS 24
आपला सिरोंचा

आरडा गाव पुन्हा सज्ज : भक्ती, परंपरा आणि वैभवाने उजळणार श्री मल्लिकार्जुन स्वामी यात्रा महोत्सव…

विदर्भ न्यूज 24 विशेष रिपोर्ट                                                      दिनांक :–04/12/2025

सिरोंचा – आरडा गावातील शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा व मानाचा समजला जाणारा श्री मल्लिकार्जुन स्वामी यात्रा महोत्सव यंदाही अपार भक्तिभावाने आणि भव्यतेने दि. ७ व ८ डिसेंबर २०२५ रोजी साजरा होत आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांतून हजारो भाविक आरड्याकडे येऊ लागले असून संपूर्ण परिसर पुन्हा एकदा भक्तीच्या महासागराने ओथंबून वाहणार असल्याचे वातावरण तयार झाले आहे.

आदीकालापासून चालत आलेली ही जत्रा केवळ धार्मिक उत्सव नसून आरडा गावाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. मल्लिकार्जुन स्वामींच्या दर्शनासाठी, मनोकामना व्यक्त करण्यासाठी आणि विशेषतः महिलांमध्ये प्रचंड उत्साह असलेल्या पारंपरिक बोनालू सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. खिर शिजवून सुंदर सजवलेल्या मडक्यात ठेवून तो मडका डोक्यावर वाहात मंदिराभोवती घालण्यात येणाऱ्या प्रदक्षिणेचा पवित्र क्षण अनुभवण्यासाठी हजारो भक्त प्रतिक्षेत असतात. भक्ती, श्रध्दा, निष्ठा, उत्साह आणि परंपरेचा संगम या दिव्य यात्रेत प्रत्येक क्षणी दिसून येतो.

यंदाही यात्रेची सुरुवात सकाळच्या गोदावरी पुण्य स्नानाने होणार असून नदीकाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी उसळणार आहे. त्यानंतर संध्याकाळी मंदिरात अखंडदीप प्रज्वलित करून भक्तीमय वातावरणाची सुरुवात होईल. पटनालू कार्यक्रमाची पारंपारिक धुमश्चक्री संपूर्ण गावात उत्साह निर्माण करणार आहे. रात्री रेकॉर्डिंग डान्सच्या माध्यमातून भाविक आणि नागरिकांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम रंगणार असून मंदिर परिसर दिवसभरापासून रात्रीपर्यंत प्रकाशाने आणि भक्तांच्या जयघोषाने उजळून निघणार आहे.

दुसऱ्या दिवसाचा सर्वात महत्त्वाचा सोहळा म्हणजे बोनालू. महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामींच्या चरणी खिर अर्पण करण्यासाठी सजविलेले मडके डोक्यावर वाहून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतात. दिवसभर मंदिर परिसरात वाहणांची, भाविकांच्या रांगा आणि पुजाअर्चेची लगबग सुरूच राहते. संपूर्ण परिसरात प्रसादाचा सुगंध दरवळत असतो आणि भाविकांच्या तोंडून “जय मल्लिकार्जुन स्वामी” हा जयघोष अविरत ऐकू येत राहतो.

अशा भव्य आणि विशाल जत्रेत भाविकांची संख्या लक्षात घेता संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस विभागाने काटेकोर नियोजन करून चोख बंदोबस्त उभारला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली फॅटिंग साहेब आणि त्यांचे सहकारी संपूर्ण परिसरात सतत गस्त ठेवून गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, सुरक्षा तपासणी आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सर्वतोपरी दक्षता घेत आहेत. गोदावरी घाटापासून मंदिर मार्गापर्यंत आणि बोनालू सोहळ्याच्या प्रदक्षिणा मार्गापर्यंत सर्वत्र पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. भाविक सुरक्षित वातावरणात दर्शन आणि पूजा-अर्चा करू शकतील, हे सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.

मंदिर समितीनेही यात्रेची संपूर्ण तयारी पूर्ण केली असून परिसराची स्वच्छता, पाणी व्यवस्था, प्रकाशयोजना, वैद्यकीय मदत, साऊंड सिस्टीम आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. ग्रामस्थ, तरुण मंडळे आणि स्वयंसेवक अत्यंत उत्साहाने या तयारीत सहभागी झाले आहेत.

यात्रा महोत्सवामुळे आरडा गाव पुन्हा एकदा श्रद्धेने उजळून निघणार असून दोन दिवस संपूर्ण परिसर भक्तिभावाने भरून जाणार आहे. इथली परंपरा, स्वामींवरील अपार भक्ती आणि यात्रेचे वैभव भाविकांना दरवर्षी नवचैतन्य देऊन जाते. यंदाही तिन्ही राज्यांतून येणाऱ्या हजारो भाविकांच्या साक्षीने हा दिव्य सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडणार असून मंदिर समितीच्या वतीने सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यंदाच्या यात्रेच्या उत्सवाला विशेष मंगलस्पर्श लाभणार आहे.या वर्षीच्या या भव्य उत्सवासाठी माजी मंत्री व अहेरी विधानसभेचे आमदार माननीय धर्मराव बाबाआत्राम हे विशेष अतिथी म्हणून प्रमुख उपस्थिती नोंदवणार आहेत. त्यांच्या आगमनाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, यात्रेच्या तयारीला आता मोठी गती मिळाली आहे. 

स्थानिक ग्रामस्थ, समिती सदस्य व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात तयारीत गुंतले असून, यात्रा अविस्मरणीय आणि यशस्वी होण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.

यंदाच्या यात्रेची सविस्तर कार्यक्रम रूपरेषा

७ डिसेंबर २०२५ – रविवार

सकाळी ८.०० वाजता : पवित्र गोदावरी पुण्य स्नान

सायंकाळी ६.०० वाजता : अखंडदीप प्रज्वलन

सायंकाळी ६.३० पासून : पारंपरिक पटनालू कार्यक्रम

रात्री १०.०० वाजता : मनोरंजनासाठी रेकॉर्डिंग डान्स कार्यक्रम

८ डिसेंबर २०२५ – सोमवार

दुपारी १.०० वाजेपर्यंत : मंदिराभोवती वाहणांना प्रदक्षिणेची परवानगी

दुपारी १.०० वाजता : मुख्य आकर्षण — श्री मल्लिकार्जुन स्वामी बोनालू (कलश यात्रा)
महिलांनी प्रसादरूपी खीर शिजवून सजविलेल्या मडक्यांसह मंदिराभोवती प्रदक्षिणा घालणार आणि हा पवित्र प्रसाद स्वामींना अर्पण करण्यात येणार. त्यानंतर भाविकांना प्रसाद वितरित केला जाणार आहे.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!