गडचिरोली प्रतिनिधी विदर्भ न्यूज 24 दिनांक 2 फेब्रुवारी 2026
गडचिरोली जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात ऐतिहासिक ठरणारा ‘कोया कृषी कुंभ २०२६’ हा भव्य कृषी महोत्सव येत्या ५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कृषी महाविद्यालय प्रांगण, चंद्रपूर रोड, सोनापूर, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे. आदिवासी अस्मिता, आधुनिक शेती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा संगम असलेल्या या कृषी कुंभाची माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली.
ही पत्रकार परिषद जिल्हाधिकारी मा. श्री. अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रिती हिरळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी यांनी कोया कृषी कुंभाच्या संकल्पना, उद्दिष्टे आणि नियोजित कार्यक्रमांची सविस्तर माहिती माध्यम प्रतिनिधींना दिली.
“अस्मिता आदिवासींची… समृद्धी शेतीची… गडचिरोलीची नवी क्रांती” ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन आयोजित करण्यात आलेला हा कृषी कुंभ केवळ प्रदर्शनापुरता मर्यादित नसून, शेतकऱ्यांना उद्योगशील बनवण्याचा व्यापक प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या कृषी कुंभाचे सर्वात मोठे आणि वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण म्हणजे ११११ किलो वजनाचा नाचणी शिरा, जो विश्वविक्रम ठरणार आहे. आदिवासी संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या नाचणीचे पोषणमूल्य, स्थानिक अन्नपरंपरा आणि तृणधान्यांचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित करण्यात येणार आहे.
कोया कृषी कुंभात २५० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात येणार असून, त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, ट्रॅक्टर व अवजारे, ड्रोन व फवारणी यंत्रे, सौर ऊर्जा साधने, पॉलिहाऊस, हायटेक शेती, जैविक व नैसर्गिक शेती, बियाणे, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, डेअरी उद्योग, मत्स्यपालन, मधमाशी पालन, बांबू उत्पादन, वनौषधी, रानभाज्या, तृणधान्ये तसेच कृषी पर्यटन यांचा समावेश असणार आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, तांत्रिक मार्गदर्शन आणि तज्ज्ञांचा सल्ला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
या कृषी कुंभामध्ये खरेदीदार-विक्रेता संमेलन, विविध विषयांवरील परिचर्चा व परिसंवाद, तसेच प्रमुख वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्या, बाजार व्यवस्थापन तज्ज्ञ, वित्तीय संस्था आणि लघुउद्योग प्रतिनिधी यांच्या सहभागामुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
महिला सक्षमीकरणाला विशेष महत्त्व देत महिला बचत गटांसाठी स्वतंत्र दालन उभारण्यात आले असून, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. यासोबतच शासकीय योजना, मार्गदर्शन दालने, कृषी सल्ला व प्रयोगशाळा सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध राहणार आहेत.
या कृषी कुंभात देशातील नामवंत कृषी तज्ज्ञ, प्रयोगशील शेतकरी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, त्यामध्ये मा. श्री. पाशा पटेल, श्री. पोपटराव पवार, श्रीमती राहीबाई पोरे, मा. श्री. पांडुरंग लावेरे, मा. श्री. विष्णु मनोहर, मा. श्री. देवाजी तोफा, मा. श्री. आनंद जकूलवार, मा. श्री. बालाजी दोने यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
कोया कृषी कुंभात कृषी विषयक कार्यक्रमांसोबतच स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी लोककला, नृत्यप्रकार आणि खवय्यांसाठी विशेष मेजवाणी आयोजित करण्यात आली असून, हा कृषी कुंभ एक सांस्कृतिक उत्सव ठरणार आहे.
या भव्य कृषी कुंभाचे उद्घाटन गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, गडचिरोली जिल्हा भूषविणार आहेत. उद्घाटन मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. कार्यक्रमाला मा. ना. अॅड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री, गडचिरोली जिल्हा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कोया कृषी कुंभ २०२६ हा गडचिरोली जिल्ह्याच्या कृषी विकासाला नवी दिशा देणारा मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
