एटापल्ली प्रतिनिधी विदर्भ न्यूज 24 दिनांक:-17 फेब्रुवारी 2026
एटापल्ली तालुक्यातील पिपली-बुर्गी परिसरात प्रस्तावित ओम साईराम कंपनीच्या लोह खदानामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांनी आज गावकऱ्यांच्या मनात चिंता, तर डोळ्यांत अपेक्षा निर्माण केली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना थेट भेटीस बोलावले.
अहेरी येथील रुख्मिणी महाल येथे झालेल्या या भेटीनंतर राजे साहेब स्वतः पिपली गावात पोहोचले आणि थेट मातीशी नातं सांगणाऱ्या गावकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
पिपली, जवेली, कुंडम, जिजावंडी, बुर्गी, वेडमागड, गणपहाडी, नैणवाडी व टोला या नऊ गावांतील शेतकरी आणि नागरिकांनी एकच सूर लावला—
“विकास हवा, पण अन्याय नको!”
शेतजमिनींचा योग्य मोबदला, स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार, तसेच रस्ते, शिक्षण व आरोग्य सुविधांचा ठोस विकास—या मागण्या गावकऱ्यांनी ठामपणे मांडल्या.
यावेळी राजे साहेबांनी प्रत्येक प्रश्न शांतपणे ऐकून घेत भावनिक शब्दांत आश्वासन दिले—
“मी तुमच्या पाठीशी उभा आहे. जल, जंगल आणि जमीन यांचे खरे मालक तुम्हीच आहात. तुम्हाला विश्वासात न घेता कोणताही निर्णय होऊ देणार नाही. तुमच्यावर अन्याय झाला, तर तो आधी माझ्याशी होईल.”
हा शब्द केवळ राजकीय नव्हता, तर आदिवासी हक्कांच्या लढ्याला दिलेली ठोस ग्वाही होती. सभेला उपस्थित असलेल्या गावकऱ्यांच्या डोळ्यांत समाधान, तर मनात नवी आशा दिसत होती.
या बैठकीला प्रत्येक गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि नऊही गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एटापल्लीच्या मातीत आज एक संदेश घुमला—
विकास हवा, पण माणुसकीसह!
