गडचिरोली विदर्भ न्यूज 24 दिनांक – 19 मार्च 2026
गडचिरोली जिल्ह्यातील माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड उपविभागातील बंगाडी येथे आज, 19 मार्च 2026 रोजी नव्या पोलीस मदत केंद्राची यशस्वी स्थापना करण्यात आली. अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती आणि सुरक्षेच्या आव्हानांमध्ये अवघ्या 24 तासांत उभारण्यात आलेले हे मदत केंद्र गडचिरोली पोलीस दलाच्या धाडस, नियोजन आणि कार्यक्षमतेचे प्रतीक ठरत आहे.
बंगाडी हे गाव उपपोस्टे लाहेरीपासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर असून छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत केवळ 2 किलोमीटर अंतरावर आहे. या भागात दीर्घकाळापासून सुरक्षा पोकळी जाणवत होती. त्या पार्श्वभूमीवर या नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना ही नागरिकांच्या सुरक्षेसोबतच विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जात आहे.
या मदत केंद्राच्या उभारणीसाठी तब्बल 1000 पेक्षा अधिक सी-60 कमांडो, 18 बीडीडीएस पथके, 500 विशेष पोलीस अधिकारी, नव्याने नियुक्त पोलीस जवान तसेच खाजगी कंत्राटदार यांचा मोठा सहभाग होता. एकूण 1050 मनुष्यबळ, 4 जेसीबी, 8 ट्रेलर, 2 पोकलेन आणि 20 ट्रक यांच्या साहाय्याने अवघ्या एका दिवसात हे केंद्र उभारण्यात आले.
नवीन पोलीस मदत केंद्रामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात वाय-फाय सेवा, 15 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट, मोबाईल टॉवर, स्वच्छता सुविधा तसेच मजबूत सुरक्षा यंत्रणा यांचा समावेश आहे. केंद्राच्या संरक्षणासाठी मॅक वॉल, बीपी मोर्चा आणि 8 सॅन्ड मोर्चे उभारण्यात आले आहेत.
या केंद्राच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 3 अधिकारी व 55 कर्मचारी, एसआरपीएफ ग्रुप 3 (जालना) चे 2 प्लाटून, सीआरपीएफ 192 बटालियनचे अधिकारी व जवान तसेच विशेष अभियान पथकाचे 200 कमांडोज तैनात करण्यात आले आहेत.
उद्घाटन सोहळा विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी स्थानिक ग्रामस्थांचाही मोठा सहभाग दिसून आला.
कार्यक्रमादरम्यान जनजागृती मेळावा आयोजित करून नागरिकांना विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. महिलांना साड्या, पुरुषांना धोतर, ब्लॅंकेट, स्वयंपाक भांडी, मच्छरदानी, युवकांना टी-शर्ट, शालेय साहित्य तर मुलांना खेळ साहित्य देण्यात आले. यामुळे नागरिकांमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास आणि आपुलकी निर्माण होत असल्याचे चित्र दिसून आले.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, “या मदत केंद्राच्या स्थापनेमुळे केवळ सुरक्षा नव्हे तर विकासाची दारेही उघडतील. या भागात रस्ते, पूल, मोबाईल नेटवर्क आणि इतर मूलभूत सुविधा पोहोचवणे आता अधिक सुलभ होईल.”
सन 2023 पासून सुरू असलेल्या सुरक्षा मजबूत करण्याच्या धोरणांतर्गत हे 11 वे पोलीस मदत केंद्र ठरले आहे. यापूर्वी फुलनार (गुंडुरवाही), तुमरकोठी आणि बिनागुंडा येथेही अशा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
वाढलेल्या सुरक्षेमुळे भविष्यात या भागात राष्ट्रीय महामार्ग, पूल, मोबाईल टॉवर तसेच गुंडेनूर नाल्यावरचे बांधकाम यांना गती मिळण्याची शक्यता आहे. तसेच भविष्यात एसटी बस सेवा सुरू होण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.
नवीन पोलीस मदत केंद्राच्या स्थापनेमुळे बंगाडी व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले. दुर्गम भागातील विकासाच्या दिशेने उचललेले हे पाऊल निश्चितच परिवर्तनाचे नवे पर्व ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
