गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक: 22/03/2026
गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25 (प्रत्यक्ष भरती 2026) साठी एकूण 717 पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरु असून आज दिनांक 22/03/2026 रोजी गडचिरोली पोलीस दलातर्फे लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा अत्यंत शिस्तप्रिय व पारदर्शक पध्दतीने गडचिरोली पोलीस दलामार्फत पार पाडण्यात आली. गडचिरोली पोलीस दलातर्फे 717 पोलीस शिपाई पदांसाठीची मैदानी चाचणी ही दिनांक 14/02/2026 ते 07/03/2026 रोजी पर्यंत गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राबविण्यात आलेली होती. सदर मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे लेखी परीक्षेसाठी पात्र एकुण 7003 उमेदवारांसाठी लेखी परीक्षा ही आज दिनांक 22/03/2026 रोजीचे सकाळी 10.00 वा. आयोजित करण्यात आलेली होती.
यामध्ये पहिला पेपर सामान्य अध्ययन या विषयाचा सकाळी 10.00 ते 11.30 या दरम्यान व दुसरा पेपर गोंडी व माडीया या विषयावर सकाळी 13.00 ते 14.30 वा. दरम्यान घेण्यात आला. पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा ही गडचिरोली शहरातील एकूण 14 केंद्रावर घेण्यात आली. सर्व 14 परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. सदर लेखी परीक्षेच्या बंदोबस्ताकरीता 166 पोलीस अधिकारी, 693 पोलीस अंमलदार तसेच 132 शिक्षक व मंत्रालयीन कर्मचारी असे एकूण 1000 च्या संख्येने मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली होती. या लेखी परीक्षेसाठी पात्र एकुण 7003 उमेदवारांपैकी 6971 पुरुष व महिला उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. लेखी परीक्षेपासून कोणतेही पात्र उमेदवार वंचित राहु नये म्हणुन वेळोवेळी सोशल मिडीया मार्फत गडचिरोली पोलीस दलाकडून सुचना देण्यात आल्या होत्या. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्राचे गुगल मॅप लोकेशन व परीक्षा केंद्रानूसार बैठक व्यवस्था सोशल मिडीयावर प्रसारित करण्यात आली होती. लेखी परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडू नये याकरिता उमेदवारांना प्रवेश देतानाच कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक साधनाबाबत मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने उमेदवारांची तपासणी केल्यानंतरच उमेदवारांना प्रवेश देण्यात आला. यासोबतच सर्व उमेदवारांना बायोमॅट्रीक पद्धतीने नोंदणीचे पुन:परिक्षण करुन त्यांना परीक्षा केंद्राच्या आत सोडण्यात आले. सदर लेखी परीक्षेकरिता अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येऊन पारदर्शक पद्धतीने सदर परीक्षा पार पडली. यासोबतच कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी तसेच सुरक्षा व्यवस्थेकरिता सिग्नल जामर कारचा देखील वापर करण्यात आला होता. तसेच पेपर क्र. 01 व पेपर क्र. 02 च्या मधल्या वेळेत उमेदवारांसाठी नाश्त्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली होती. आज दिनांक 22 मार्च 2026 रोजी आयोजित दोन्ही पेपरची उत्तर पत्रिका ही गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली असून उमेदवारांना सदर दोन्ही पेपरच्या अनुषंगाने काही आक्षेप असल्यास 24 तासांच्या आत नोंदवावी.
सदर लेखी परीक्षा पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा श्री. रविंद्र भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा श्री. संदेश नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली श्री. चैतन्य कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, पेंढरी श्री. जगदिश पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी श्री. अजय कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा श्री. राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सुरळीतपणे पार पडली.
