मुंबई, विशेष प्रतिनिधी दिनांक 22 मार्च 2026
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि विदर्भातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे दत्ता मेघे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, विविध स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दत्ता मेघे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम केले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी उभारलेल्या संस्थांमुळे हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले.
गरिबांसाठी मोफत उपचार सुविधा, वंचित घटकांसाठी मदतीचा हात आणि समाजहितासाठी केलेले कार्य यामुळे ते केवळ राजकारणी न राहता समाजसेवक म्हणूनही ओळखले गेले. त्यांच्या निधनामुळे एक दूरदृष्टी असलेला नेता आणि समाजाचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्ता मेघे यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “दत्ता मेघे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून राजकारण आणि सामाजिक कार्य केले. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने लोकनेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांमुळे विदर्भातील तरुणांना मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या.”
ते पुढे म्हणाले, “दातृत्व हे दत्ताभाऊंचे वैशिष्ट्य होते. गरिबांसाठी मोफत उपचार सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम आणि समाजातील वंचित घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. वर्धा, नागपूर आणि संपूर्ण विदर्भाच्या विकासासाठी त्यांनी पक्षीय भेद बाजूला ठेवून सातत्याने काम केले.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैयक्तिक भावना व्यक्त करत सांगितले की, “माझे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. अनेक विषयांवर त्यांनी वडिलकीच्या नात्याने मार्गदर्शन केले. त्यांच्या निधनाने माझी वैयक्तिक हानी झाली आहे.”
शेवटी त्यांनी दत्ता मेघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात राज्य सरकार सहभागी असल्याचे नमूद केले.
