गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक 24 मार्च 2026
विद्यापीठ कर्मचारी यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या न्यायोचित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा आज पहिला टप्पा सुरू झाला.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून नियमित कामकाज करीत विद्यापीठ प्रशासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध नोंदविला.
कर्मचारी संघटनेने दिनांक १३ मार्च २०२६ रोजी प्रशासनास निवेदन सादर करून विद्यापीठ कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले होते. तसेच या मागण्यांची तातडीने पूर्तता करण्यात यावी, अन्यथा कर्मचारी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा स्पष्ट इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटना व अधिकारी संघटना या दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची विद्यापीठ प्रशासनासोबत दिनांक २३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. याबाबत दोन्ही संघटनांनी प्रशासनास स्पष्ट शब्दांत कळविले की, कर्मचाऱ्यांना आता केवळ सकारात्मक चर्चेची आश्वासने नकोत, तर मागण्यांवर ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी अपेक्षित आहे. जोपर्यंत मागण्यांची पूर्तता अथवा सोडवणूक होत नाही, तोपर्यंत पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आंदोलनाचे सर्व टप्पे पार पाडले जातील, अशी ठाम भूमिका संघटनांनी बैठकीत मांडली. त्यामुळे प्रशासानासोबतची बैठक निष्फळ ठरली.
प्रशासनासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेची माहिती अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आली यावेळी दोन्ही संघटनांचे पदाधिकारी तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडून वारंवार टाळाटाळ केली जात असून, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या न्यायोचित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे आंदोलनाचा पहिला टप्पा आजपासून सुरू करण्यात आला असून, मागण्यांची समाधानकारक पूर्तता न झाल्यास पुढील टप्प्यांतील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा कर्मचारी संघटनेचे सचिव सतिश पडोळे यांनी दिला.
