आलापल्ली विदर्भ न्यूज विशेष प्रतिनिधी दि.15 एप्रिल 2026
आलापल्ली वनविभागातील कथित भ्रष्टाचार, मनमानी कारभार आणि कर्मचाऱ्यांवरील दडपशाहीच्या विरोधात आलापल्ली येथील क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून, दिनांक 16 एप्रिलपासून विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आलापल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा आपल्या प्रलंबित मागण्या व तक्रारी प्रशासनाकडे मांडल्या. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
कर्मचाऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. जी. जी. गणवीर यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, त्यांच्या कार्यकाळात मनमानी व भ्रष्ट कारभार वाढला असून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना गुलामांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. कामांच्या मंजुरी प्रक्रियेत जाणूनबुजून अडथळे निर्माण करून अंदाजपत्रकीय रकमेच्या केवळ 25 ते 30 टक्क्यांमध्ये कामे पूर्ण करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तसेच, जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत सन 2024 पासून झालेल्या विविध कामांमध्ये ठेकेदारांशी संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मजुरांची मजुरी वरिष्ठ स्तरावरून प्राप्त होऊनही दोन ते तीन महिने अदा केली जात नसल्याने मजूर आर्थिक संकटात सापडत असल्याची बाबही समोर आली आहे.
याशिवाय, महिला कर्मचाऱ्यांशी अशोभनीय वर्तन, अपमानास्पद भाषा वापरणे व मानसिक दबाव टाकणे यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. RTGS व्यवहारांमध्येही अफरातफर होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, या सर्व प्रकरणांबाबत सखोल चौकशी होऊनही वरिष्ठ स्तरावरून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी आंदोलन हाच एकमेव पर्याय उरल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या आंदोलनामुळे वनविभागाच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
