अहेरी विदर्भ न्यूज 24प्रतिनिधी दिनांक:- 26एप्रिल 2026
अहेरी तालुक्यातील उमानूर येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर स्वरूपाचा गैरप्रकार उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या धानाची खरेदी जाणीवपूर्वक टाळून, संस्था पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने अफरातफर केल्याचा आरोप पुढे आला आहे. या प्रकरणामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून त्यांनी न्यायासाठी थेट सामाजिक कार्यकर्ता संतोष भाऊ ताटीकोंडावार यांच्याकडे धाव घेतली आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १५ ते २१ मार्च २०२६ दरम्यान अनेक शेतकरी आपले धान विक्रीसाठी उमानूर येथील खरेदी केंद्रावर घेऊन आले होते. मात्र, संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि ग्रेडर यांनी संगनमताने या धानाची खरेदी नाकारली. विविध कारणे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवण्यात आले, तर काहींचे धान सोसायटीच्या आवारातच पडून ठेवण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना आर्थिक फटका बसला आहे.
या घटनेनंतर काही दिवसांनी, म्हणजेच ६ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास, ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर धान गोदामात आणून त्याची गुपचूप खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे धान नेमके कोणाचे होते, याबाबत स्पष्टता नसून यावरून संशय अधिक गडद झाला आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे, या धानाची प्रत्यक्ष खरेदी एप्रिल महिन्यात झाली असताना, त्याची बिले मात्र मार्च महिन्यातील जुन्या तारखांमध्ये तयार करण्यात आली आहेत. या प्रकारामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाबाबत शेतकऱ्यांनी उपप्रादेशिक व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा चौकशी करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या निष्क्रिय भूमिकेमुळे शेतकरी अधिकच संतप्त झाले आहेत. “आम्ही रात्रंदिवस मेहनत करून पिकवलेले धान विकायला आणतो, पण ते घेतले जात नाही. उलट काही मोजक्या लोकांचे धान मागच्या तारखेत खरेदी करून त्यांना फायदा करून दिला जातो. हा आमच्यावर अन्याय आहे,” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
या अन्यायाविरोधात आवाज उठवत शेतकऱ्यांनी संतोष भाऊ ताटीकोंडावार यांची भेट घेतली आणि संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. संतोषभाऊ यांनीही शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत, या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांचा विश्वास प्रशासनावरून उडेल, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकरणामुळे संपूर्ण अहेरी तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आता प्रशासन या गंभीर आरोपांकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि दोषींवर कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी तातडीने निष्पक्ष चौकशी होऊन दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
