गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:- 23 जून 2026
आदिवासी विद्यार्थ्यांना देशाच्या लोकशाही संस्था, ऐतिहासिक वारसा, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि उच्च शिक्षणाच्या संधींची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांतील ९६ विद्यार्थ्यांची दिल्ली शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली आहे. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेण्याची विशेष संधी मिळणार आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत गडचिरोली, अहेरी आणि भामरागड येथील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा या सहलीत समावेश आहे. यामध्ये गडचिरोली प्रकल्पातील ५२, अहेरी प्रकल्पातील २५ आणि भामरागड प्रकल्पातील १९ अशा एकूण ९६ विद्यार्थ्यांचा सहभाग असून त्यांच्यासोबत ९ महिला व पुरुष कर्मचारी मार्गदर्शक म्हणून सहभागी होत आहेत. त्यामुळे एकूण १०५ जणांचा ताफा दिल्ली दौऱ्यावर रवाना झाला आहे.
दि. २३ ते २८ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सहलीत विद्यार्थी चार दिवस दिल्ली येथे मुक्काम करणार आहेत. राष्ट्रपती भवनातील भेटीव्यतिरिक्त विद्यार्थी संसद भवन, पंतप्रधान संग्रहालय, राष्ट्रीय विज्ञान केंद्र, आयआयटी दिल्ली, जंतरमंतर, राजघाट तसेच लाल किल्ला, कुतुबमिनार आणि राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय यांसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट देणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशाची संसदीय व्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती, सांस्कृतिक वारसा आणि उच्च शिक्षण संस्थांची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.
विद्यार्थ्यांचा ताफा आज गडचिरोली येथून रवाना झाला. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विद्यार्थ्यांना या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले. देशातील सर्वोच्च घटनात्मक संस्थांची प्रत्यक्ष ओळख करून घेताना विद्यार्थ्यांनी नवे ज्ञान, अनुभव आणि प्रेरणा मिळवून आपल्या भविष्यासाठी मोठी स्वप्ने पाहावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संस्था, ऐतिहासिक स्थळे आणि देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्तीशी प्रत्यक्ष भेटीची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम त्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच या अनुभवातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून उच्च शिक्षण व स्पर्धात्मक क्षेत्रांकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
