गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-02जून 2026
“मोठी स्वप्ने पाहा, शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा,” असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमधील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात अत्यंत आत्मीयतेने स्वागत केले. विद्यार्थ्यांना चॉकलेट देत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधत नाव, गाव, शिक्षण आणि भविष्यातील ध्येयाविषयी विचारपूस केली. देशाच्या प्रथम नागरिकांशी झालेला हा संवाद विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर स्मरणात राहणारा प्रेरणादायी क्षण ठरला.
जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या दिल्ली शैक्षणिक सहलीत गडचिरोली, अहेरी आणि भामरागड येथील शासकीय आश्रमशाळांमधील ९६ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. काल राष्ट्रपती भवनात पोहोचताच विद्यार्थ्यांचे उबदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधत त्यांचे नाव, ते कोणत्या गावातून आले आहेत, कोणत्या वर्गात शिक्षण घेत आहेत आणि भविष्यात काय बनण्याची इच्छा आहे, याची उत्सुकतेने विचारपूस केली.
संवादादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील पोटेगाव येथील एका विद्यार्थ्याने, “मी भविष्यात शिक्षक बनणार आहे,” अशी इच्छा व्यक्त केली. विद्यार्थ्याचे ध्येय ऐकून राष्ट्रपतींनी त्याचे कौतुक केले आणि शिक्षणात सातत्य, मेहनत व चिकाटी ठेवून मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला. राष्ट्रपतींच्या या आत्मीय संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला.
*राष्ट्रपती भवनाची सफर; ऐतिहासिक वारशाचा प्रत्यक्ष अनुभव*
भेटीनंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनातील विविध ऐतिहासिक दालने, भव्य वास्तू, परिसर आणि अन्य महत्त्वाच्या भागांची विशेष सफर घडविण्यात आली. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक संस्थेचे कार्य, राष्ट्रपती भवनाचा इतिहास आणि त्याचे वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य यांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली. राष्ट्रपती भवन प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहारची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या आदरातिथ्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
दिल्ली शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थी संसद भवन, पंतप्रधान संग्रहालय, राष्ट्रीय विज्ञान केंद्र, आयआयटी दिल्ली, जंतरमंतर, राजघाट, लाल किल्ला, कुतुबमिनार तसेच राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय यांसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांनाही भेट देत आहेत. या भेटींमधून विद्यार्थ्यांना देशाची लोकशाही व्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती, सांस्कृतिक वारसा आणि उच्च शिक्षणाच्या संधींची व्यापक माहिती मिळत आहे.
