भामरागडमध्ये इंद्रावती व पर्लकोटा नदीला पूर — राष्ट्रीय महामार्ग 130 डीवरील वाहतूक खंडित…

गडचिरोली (26 ऑगस्ट 2025) : विदर्भ न्यूज 24
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील इंद्रावती नदीच्या पाणलोट क्षेत्रात तसेच छत्तीसगड राज्यातील लगतच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वाढीमुळे भामरागड येथे पर्लकोटा नदीला पूर आला असून परिसरात पुरस्थिती गंभीर बनली आहे.
पुराच्या पूर्वसूचनेनंतर प्रशासनाने तत्परता दाखवली असून, काल (25 ऑगस्ट) रात्रीच भामरागड शहरातील बाजारपेठेतील दुकानदारांचे साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठे नुकसान होण्यापासून वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे.
दरम्यान, आलापल्ली–भामरागड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 130 डी वरील पर्लकोटा नदीचा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे हेमलकसा–लाहेरी या मार्गावरील वाहतूक संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.SR
सद्यस्थितीत नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून, पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी सतत पाहणी करत आहेत.