*गडचिरोलीला विकासातील अग्रणी जिल्हा बनवणार!*
*गडचिरोली जिल्हा वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा!*

मुंबई विशेष प्रतिनिधी दिनांक:- 25 ऑगस्ट 2025
बरेच काही करतो आहे आणि आणखी खूप काही करायचे आहे. हा आमच्यासाठी राज्यातील शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा आहे. गडचिरोलीला विकासातील अग्रणी जिल्हा बनवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
गडचिरोली जिल्हा निर्मितीला उद्या, 26 ऑगस्ट रोजी 43 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा जिल्हा गेली अनेक दशके विकासापासून वंचित राहिला. पण, 2014 पासून आम्ही त्याला विकासाच्या केंद्रस्थानी आणले. गडचिरोलीला माओवादापासून मुक्त करणे आणि तो उद्योग, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधायुक्त करणे, याला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहिले. आज अर्धा गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त झाला. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांनी मार्च 2026 पर्यंत संपूर्ण देश माओवादमुक्त करण्याचा जो निर्धार केला आहे, त्यादिशेने आम्ही काम करतो आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आमचे गडचिरोलीचे पोलिस, सी-60 जवानांसह यात मोठा वाटा देत आहेत. पोलिस दादालोरा खिडकीसारख्या उपक्रमांनी पोलिस या विकास प्रक्रियेतील अग्रदूत बनले आहेत. गडचिरोलीला देशातील पोलाद सिटी बनविण्याच्या दिशेने आम्ही अतिशय गतीने पाऊले टाकली आहेत. सुमारे 1 लाख कोटींची गुंतवणूक ही गडचिरोली जिल्ह्यात येत आहे. हे करीत असताना गडचिरोलीचे जल, जमीन, जंगल आणि पर्यावरण राखण्यावर आमचा तितकाच भर आहे. मेडिकल कॉलेज असो, विमानतळ असो, रेल्वेमार्ग असो, रस्त्यांची कामे असो, शिक्षणाच्या सुविधा अशा सर्वच दिशांनी आज गडचिरोली जिल्हा भक्कम प्रगती करतो आहे. अर्थात यात गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचीही तितकीच भक्कम साथ लाभते आहे आणि त्यांच्यामुळेच ही विकास प्रक्रिया गतिमान झाली आहे. सर्व जिल्हावासियांना गडचिरोली जिल्हा स्थापनादिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.