अहेरी (प्रतिनिधी) दिनांक 2 एप्रिल 2026
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरीत्या दारूची वाहतूक व विक्री सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी यापूर्वी केलेल्या कारवायांमधील जप्त मुद्देमाल अखेर नष्ट करण्यात आला. अहेरी, वेंकटापूर, राजाराम (खा) व पेरिमिली येथील एकूण १५९ गुन्ह्यांमधील १ कोटी ३२ हजार ६७५ रुपयांचा मुद्देमाल दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी नष्ट करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात अवैध दारूविरोधी मोहिम राबवली जात असून, त्या अंतर्गत विविध ठिकाणी गुन्हे दाखल करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र हा मुद्देमाल नाशवंत असल्याने तसेच नवीन कारवायांमध्ये सतत जप्ती होत असल्याने दीर्घकाळ साठवणूक करणे अडचणीचे ठरत होते. त्यामुळे न्यायालय व राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेऊन हा मुद्देमाल नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन अहेरी येथील सन २०२४ ते २०२५ या कालावधीतील १४२ गुन्ह्यांमधील, पोस्टे पेरिमिली येथील ७ गुन्ह्यांमधील, पोस्टे वेंकटापूर येथील २ गुन्ह्यांमधील, तसेच पोस्टे राजाराम येथील ८ गुन्ह्यांमधील महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल या कारवाईत नष्ट करण्यात आला.
सदर कारवाईदरम्यान दोन पंचांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने १५ बाय १५ फूट खोल खड्डा खोदण्यात आला. त्यानंतर रोड रोलरच्या सहाय्याने कडक व मुरमाड जागेवर मुद्देमाल पसरवून काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्यांचा चुरा करण्यात आला. पुढे हा चुरा खड्ड्यात टाकून खड्डा पुन्हा बुजवण्यात आला. संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक शुभम (शु. के.) चौधरी, सपोनि पटले, पोलीस उपनिरीक्षक आनंद आवारे, योगेश महाजन, संतोष सडमेक तसेच इतर अमलदार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
पोलीस प्रशासनाच्या या निर्णायक पावलामुळे अवैध दारू व्यवसायाला मोठा आळा बसण्याची शक्यता असून, पुढील काळातही अशाच कडक कारवाया सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
— विदर्भ न्यूज 24#अहेरीपोलीस #अवैधदारू #गडचिरोली #पोलीसकारवाई #अजयकोकाटे #दारूबंदी
