अहेरी विदर्भ न्यूज 24 प्रतिनिधी दिनांक:-01 एप्रिल 2026
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली असून पोलीसांनी तब्बल ७ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दि. ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.३० ते ५.४५ वाजताच्या सुमारास अहेरी पोलीसांचे पथक नियमित पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मोजा इंदाराम जंगल परिसर, आलापल्ली–सिरोंचा मार्गावरील पुलाजवळ संशयित वाहन दिसून आले. पोलीसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पोलिसांना चकवा देत वाहन जंगलाच्या दिशेने नेऊन अंधाराचा व जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.
यानंतर पंचांसमक्ष वाहनाची तपासणी करण्यात आली असता, पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो (क्र. एमएच ४० सीए १७७२) या वाहनात मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा आढळून आला. यामध्ये ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या ९० मिली मापाच्या तब्बल ४३ खोक्यांमध्ये एकूण ४३०० सीलबंद बाटल्या मिळून आल्या. या दारूची किंमत अंदाजे ३ लाख ४४ हजार रुपये असून वाहनाची किंमत सुमारे ४ लाख रुपये आहे. अशाप्रकारे एकूण ७ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी दादाराव चिन्नू सिडाम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ) अंतर्गत गुन्हा क्रमांक १०२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची नोंद मपोना मनिषा मुलकावार यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चैतन्य घावटे करीत आहेत. या कारवाईवर प्रभारी पोलीस निरीक्षक हर्षल व्ही. ऐकरे यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, अहेरी परिसरात अवैध दारू वाहतुकीविरुद्ध पोलीसांनी आक्रमक मोहीम सुरू केल्याचे दिसून येत असून अशा कारवायांमुळे बेकायदेशीर धंद्यांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.#AheriPolice #Gadchiroli #IllegalLiquor #VidarbhaNews24 #CrimeNews #PoliceAction
