⚡ विदर्भ न्यूज 24 विशेष ⚡
आलापल्ली (विदर्भ न्यूज 24 ब्यूरो) दिनांक 15 एप्रिल 2026
आलापल्ली परिसरात वीजपुरवठा व्यवस्थेतील ढिसाळ कारभाराचा फटका थेट जंगलाला बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 33 केव्ही वीज फिडरमधून निघालेल्या स्पार्कमुळे जंगलात आग लागल्याने नैसर्गिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले. मात्र, या गंभीर घटनेदरम्यान अधिकाऱ्यांकडून दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळे स्थानिकांमध्ये संताप उसळला आहे.
घटनास्थळी पाहणी केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सांगितले की, वीज लाईनच्या आजूबाजूला आवश्यक ती साफसफाई व झाडांची छाटणी वेळेत करण्यात आलेली नव्हती. नियमांनुसार ‘फिनिशिंग वॉल’ परिसर स्वच्छ ठेवणे बंधनकारक असताना त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. परिणामी, स्पार्क झाल्यानंतर आगीने वेगाने फैलाव घेतला.
तज्ज्ञांच्या मते, अशा जंगल परिसरात वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र फिडर आणि अधिक सुरक्षित पर्यायी व्यवस्था आवश्यक असते. मात्र, योग्य नियोजनाऐवजी थेट 33 केव्ही लाईनवर अवलंबून राहिल्यामुळे धोका वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः 132 केव्ही लाईनद्वारे संतुलित पुरवठा करण्याचा पर्याय दुर्लक्षित केल्याचा आरोपही होत आहे.
या सर्व प्रकारात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, घटना ताजी असतानाच संबंधित अधिकाऱ्यांकडून ‘जेवणाच्या आमंत्रणा’ची चर्चा रंगली. जंगल जळत असताना प्रशासन ‘सेलिब्रेशन मोड’मध्ये असल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला. “आग विझवण्यापेक्षा इमेज मॅनेजमेंटला प्राधान्य?” असा सवालही उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे महावितरणच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, केवळ कागदोपत्री नियम आणि प्रत्यक्षात निष्काळजीपणा अशी परिस्थिती असल्याची टीका होत आहे.
➡️ नागरिकांची ठाम मागणी:
या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच जंगल भागातील वीज यंत्रणा तातडीने सुरक्षित आणि मानकांनुसार उभी करावी, अशी मागणी नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
—
(विदर्भ न्यूज 24)
