सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक 17 एप्रिल 2026
सिरोंचा तालुक्यातील वीजपुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, तिचे तीव्र वास्तव नागरिकांना थेट अनुभवायला मिळत आहे. विशेष म्हणजे, या समस्येविरोधात महावितरण कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला देखील याच समस्येचा फटका बसला. निवेदन सादर करत असतानाच अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि संपूर्ण कार्यालय अंधारात बुडाले. त्यामुळे निवेदन देण्यासाठी आलेल्या नागरिकांना अक्षरशः बाहेर येऊन आपली मागणी मांडावी लागली. या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये संतापाची लाट उसळली.
हा प्रकार केवळ योगायोग नसून, सिरोंचा तालुक्यातील वीज व्यवस्थेची बिकट अवस्था अधोरेखित करणारा आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. ज्या विभागाकडे तक्रार मांडण्यासाठी नागरिक येतात, त्याच ठिकाणी वीज नसणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत “सामान्य नागरिकांची अवस्था मग काय असेल?” असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला.
सध्या तालुक्यात दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यातच कमी दाबाने वीज येत असल्याने घरगुती तसेच व्यावसायिक उपकरणे बंद पडत आहेत. फ्रिज, टीव्ही, कुलर, पंखे यांसारखी साधी उपकरणेसुद्धा व्यवस्थित चालत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मोटारी आणि लघुउद्योजकांची यंत्रसामग्री जळून नुकसान होत असल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. उन्हाळ्याच्या कडाक्यात ही परिस्थिती अधिकच असह्य बनली असून, लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
दरम्यान, आलापल्ली ते सिरोंचा या ६६ केव्ही लाईनवर झाडे-झुडपे वाढल्याने पावसाळ्यात वीजपुरवठा आणखी खंडित होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ट्री कटिंग करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याचबरोबर, तेलंगणा राज्यातील किष्टमपेट येथून प्रस्तावित १३२ केव्ही विद्युत वाहिनीचे काम मागील एक वर्षापासून बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. ही लाईन पूर्ण झाल्यास तालुक्यातील वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो, मात्र काम रखडल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
या संदर्भात उपविभागीय कार्यकारी अभियंता बालपांडे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले—
> “सिरोंचा येथील वीजपुरवठ्याची समस्या ही स्थानिक पातळीवरील नसून वरच्या स्तरावरून येणाऱ्या व्होल्टेजवर अवलंबून आहे. जसं पार्ले-जी बिस्कीट तयार होऊन येतं आणि दुकानदार फक्त विकतो, तसं आम्ही वरून येणारा वीजपुरवठा इथे वितरित करतो. त्यामुळे या समस्येत आमचा थेट हस्तक्षेप मर्यादित आहे.”
> “१३२ केव्ही लाईनबाबत माहिती असूनही तेलंगणा राज्यातील काही अधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. तरीही हे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
मात्र निवेदन देतानाच वीज खंडित होण्याच्या घटनेमुळे या स्पष्टीकरणावर नागरिक समाधान व्यक्त करत नसून, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.
नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पुढील आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच परिस्थिती सुधारली नाही, तर वीज बिल न भरण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या शिष्टमंडळात प्रशांत चकिनारापुवार , सतीश राचर्लावार, समीर आरगेलवार, शारीक शेख, संदीप राचर्लावार, मनीष गुज्जावार, रवीतेजा माणिख्यमवार, मनीष चकिनारापुवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
एकंदरीत, सिरोंचा तालुक्यातील वीजपुरवठ्याची समस्या आता केवळ तक्रारींच्या पातळीवर राहिलेली नसून ती प्रत्यक्ष अनुभवाच्या स्वरूपात समोर येत आहे. निवेदन देतानाच अंधार पडणे हा प्रकार प्रशासनासाठी इशारा मानला जात असून, तात्काळ उपाययोजना न झाल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
