गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-05 जुन 2026
गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी जिल्ह्याचे सह-पालकमंत्री आज गडचिरोली येथे भेट देणार आहेत. ही माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून भूमी अधिग्रहणासह विविध शेतकरी प्रश्नांवर आंदोलन सुरू असून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आंदोलनस्थळी जाऊन शेतकरी, नागरिक आणि आंदोलनकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा, अडचणी आणि शासनाकडून असलेल्या अपेक्षा स्पष्टपणे मांडल्या.
शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्या जाणून घेतल्यानंतर आमदार डॉ. नरोटे यांनी तत्काळ राज्याचे सह-पालकमंत्री यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. विशेष म्हणजे, त्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित शेतकरी प्रतिनिधींचे थेट सह-पालकमंत्र्यांशी फोनवर बोलणे करून दिले. यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी आपल्या मागण्या, भूमी अधिग्रहणासंदर्भातील चिंता आणि स्थानिक प्रश्न थेट सह-पालकमंत्र्यांसमोर मांडले.
शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर सह-पालकमंत्र्यांनी या विषयाची गंभीर दखल घेत तातडीने गडचिरोली भेटीचा निर्णय घेतला. शेतकरी, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करून सर्वमान्य मार्ग काढण्याचा प्रयत्न या दौऱ्यात केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ते सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ दिला जाणार नाही. शासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधून सकारात्मक आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रनयजी खुणे, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भारतजी खटी तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आजच्या भेटीकडे जिल्ह्याचे लक्ष
शेतकरी संघर्ष कृती समितीच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील वातावरण तापले असताना सह-पालकमंत्र्यांची गडचिरोली भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीदरम्यान होणाऱ्या चर्चेतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांसह जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत.
