अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक 5 जून 2026
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागात पुन्हा एकदा मानवी नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. मुलचेरा तालुक्यातील लगाम चेक येथे दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची लाकडी बल्लीने डोक्यावर आणि चेहऱ्यावर जबर प्रहार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती, हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, नारायण आशा टेकाम (वय ६१ वर्षे) हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. दिनांक ४ जून २०२६ रोजी रात्री सुमारे १० ते ११.५० वाजताच्या दरम्यान त्यांचा मोठा मुलगा विजय नारायण टेकाम (वय ४० वर्षे) हा दारूच्या नशेत घरी परतला. घरात आल्यानंतर त्याच्यात आणि वडिलांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला.
सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची असलेला हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला. संतापाच्या भरात विजयने घरात असलेली लाकडी बल्ली उचलून वडिलांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जोरदार प्रहार केले. अचानक झालेल्या या भीषण हल्ल्यात नारायण टेकाम गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या अमानुष घटनेने गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसला असून, दारूमुळे उद्ध्वस्त होत चाललेल्या कुटुंबव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी मृतकाचे भाऊ तुळशीराम आशा टेकाम (वय ६५ वर्षे) यांनी अहेरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून अहेरी पोलिसांनी आरोपी विजय नारायण टेकाम याच्याविरुद्ध अपराध क्रमांक ०१६६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळ अहेरी पोलीस ठाण्यापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पंचनामा आणि आवश्यक तपास प्रक्रिया पूर्ण केली. अहेरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून दारूच्या व्यसनामुळे नातेसंबंध कसे उद्ध्वस्त होतात याचे विदारक उदाहरण ठरत आहे. ज्यांनी जन्म दिला, वाढवले आणि आयुष्यभर कष्ट करून मुलाला मोठे केले, त्याच वडिलांचा जीव मुलाच्या हातून जाण्याची ही घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी ठरली आहे.
