एटापल्ली विशेष प्रतिनिधी दिनांक : 05सप्टेंबर 2026
तालुक्यातील जवेली खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पीपली (बुर्गी) परिसरात प्रस्तावित असलेल्या ओम साई राम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पाला घेऊन स्थानिक ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रस्तावित प्रकल्पामुळे परिसरातील अनेक गावे प्रभावित होण्याची शक्यता असल्याने प्रकल्पासंदर्भातील निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांच्या अटी-शर्ती, मागण्या आणि भविष्यातील परिणाम याबाबत प्रशासन व कंपनीने ग्रामस्थांसमोर खुली आणि पारदर्शक चर्चा करावी, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
यासंदर्भात पीपली, बुर्गी, जवेली खुर्द, जिजावंडी, वेलमागड आदी परिसरातील ग्रामस्थांनी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री आणि माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या विविध समस्या व मागण्या मांडत निवेदन सादर केले. प्रस्तावित कंपनी प्रकल्पामुळे स्थानिकांच्या जमिनी, पर्यावरण, नैसर्गिक संसाधने, रोजगाराच्या संधी आणि परिसराच्या भविष्यातील विकासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक जनतेला विश्वासात घेऊनच पुढील प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात कंपनीच्या प्रस्तावासाठी ग्रामसभेचा ठराव मिळविताना काही मोजक्या व्यक्तींमार्फत आर्थिक प्रलोभन देऊन तसेच ग्रामस्थांची दिशाभूल करून ग्रामसभेची प्रक्रिया प्रभावित केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकल्पामुळे पीपली, बुर्गी, जवेली खुर्द, जिजावंडी, वेलमागड यासह परिसरातील अनेक गावांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्प उभारणीपूर्वी स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य, पर्यावरणाचे संरक्षण, जमीन व नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन, स्थानिक पायाभूत सुविधांचा विकास आणि प्रभावित गावांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशा विविध मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या आहेत.
या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी तहसीलदार, एटापल्ली यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी यांनाही निवेदन सादर केले आहे. कंपनी प्रकल्पासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रभावित गावांतील नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या वतीने कंपनीचे अधिकारी, प्रशासनातील संबंधित अधिकारी आणि प्रभावित गावांतील नागरिक यांची संयुक्त खुली बैठक आयोजित करण्यात यावी, अशी विशेष मागणी करण्यात आली आहे. या बैठकीत प्रकल्पाचे स्वरूप, स्थानिकांवर होणारे संभाव्य परिणाम, रोजगार, पर्यावरण, जमीन, नैसर्गिक संसाधने आणि गावांच्या विकासासंदर्भातील सर्व मुद्द्यांवर ग्रामस्थांसमोर सविस्तर चर्चा व्हावी आणि त्यानंतर सर्वमान्य निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.
ग्रामस्थांची भूमिका ऐकून घेताना माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि व्यथा समजून घेतल्या. आपण स्थानिक ग्रामस्थांच्या सोबत असून, प्रभावित नागरिकांच्या न्याय्य मागण्या कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, तसेच या विषयाचा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
माजी राज्यमंत्री आत्राम यांच्या आश्वासनानंतर पीपली (बुर्गी) परिसरातील ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या असून, आता प्रस्तावित कंपनी प्रकल्पासंदर्भात प्रशासन आणि कंपनीकडून प्रभावित गावांच्या मागण्यांबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता कोणतीही प्रक्रिया पुढे नेऊ नये, अशी ग्रामस्थांची ठाम भूमिका असल्याने आगामी काळात या प्रकल्पाचा मुद्दा अधिक चर्चेत येण्याची शक्यता आहे.
यावेळी पीपली येथील सचिन लेकामी, पुरुषोत्तम हेडो, दिलीप लेकामी, नानसू हिचामी, पेका लेकामी, मधुकर मट्टामी, संदीप लेकामी, भिवा पदा, रणजित लेकामी, प्रवीण लेकामी, बुर्गी येथील अजित नरोटे, विनोद पदा, अब्बू नरोटे, गणेश नरोटे, जिजावंडी येथील सत्तू तुमरेट्टी, सदाशिव तुमरेट्टी, मंगेश नरोटे, जवेली खुर्द येथील किशोर नरोटे, नागेश गोटा, नरेश दुर्वा, नितेश गोटा यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
— विदर्भ न्यूज २४ नेटवर्क
