आष्टी, विशेष प्रतिनिधी दिनांक:-08सप्टेंबर2026
आष्टी येथील वैनगंगा नदीत मद्यधुंद अवस्थेत एका युवकाने उडी घेतल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी गेलेले दोन जणही नदीच्या मध्यभागी अडकून पडल्याची थरारक घटना मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी घडली. नदीपात्रातील वाढलेली पाण्याची पातळी आणि प्रवाहामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. अखेर आष्टी पोलिसांनी तातडीने SDRF पथकाला पाचारण करून बचावकार्य राबविले. SDRF जवानांच्या अथक प्रयत्नांमुळे तिन्ही जणांना सुरक्षितपणे नदीबाहेर काढण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, धोंडू मानपल्लीवार (वय ४४ वर्षे) यांनी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत पहाटे सुमारे ६ वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीच्या पात्रात उडी घेतली. नदीत उडी घेतल्यानंतर त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला; मात्र नदीपात्रातील पाण्याची वाढलेली पातळी आणि खडकांमुळे ते नदीतील एका खडकाजवळ अडकून पडले.
ही माहिती परिसरात समजताच आष्टी येथील पोहण्यात तरबेज असलेले निरंजन डोरलीकर आणि संतोष मडावी हे धोंडू मानपल्लीवार यांना वाचविण्यासाठी नदीपात्रात उतरले. दोघेही पोहत त्यांच्याजवळ पोहोचले; मात्र पाण्याची पातळी अधिक असल्याने आणि नदीच्या प्रवाहामुळे त्यांनाही परत किनाऱ्यावर येणे शक्य झाले नाही. त्यामुळे मदतीसाठी गेलेले दोघे आणि नदीत अडकलेला युवक असे तिघेही नदीच्या मध्यभागी अडकले.
घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गडचिरोली येथून SDRF पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यानंतर SDRF जवानांनी आवश्यक सुरक्षा साधनांसह नदीपात्रात बचावकार्य सुरू केले.
तब्बल नऊ तास नदीपात्रात अडकून राहिलेल्या धोंडू मानपल्लीवार यांच्यासह निरंजन डोरलीकर आणि संतोष मडावी यांना अखेर SDRF पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
या बचावकार्यात आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी तत्परता दाखवत आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच पोलीस कर्मचारी राजू पोराजवार यांनी बचावकार्यादरम्यान अथक परिश्रम घेतले. पोलिसांची तत्परता आणि SDRF जवानांच्या धाडसी प्रयत्नांमुळे तिन्ही जणांचे प्राण वाचले.
दरम्यान, धोंडू मानपल्लीवार यांनी नेमक्या कोणत्या कारणातून नदीत उडी घेतली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.
वैनगंगा नदीत वाढलेली पाण्याची पातळी लक्षात घेता नागरिकांनी नदीपात्रात उतरताना विशेष खबरदारी घ्यावी, तसेच मद्यप्राशन करून पाण्यात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
— विदर्भ न्यूज २४ नेटवर्क
