सहा वरिष्ठ जहाल माओवाद्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्या समोर केले आत्मसमर्पण

गडचिरोली :विदर्भ न्यूज 24 नेटवर्क
दिनांक : 24 सप्टेंबर 2025
जिल्ह्यातील माओवादविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून तब्बल सहा वरिष्ठ जहाल माओवादी कार्यकर्त्यांनी आज (24 सप्टेंबर 2025 रोजी) महाराष्ट्र राज्याच्या मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या समोर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पित माओवादींमध्ये डिव्हीसीएम दर्जाचे दाम्पत्य भिमन्ना ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे (58) आणि विमलक्का ऊर्फ शंकरअक्का सडमेक (56) यांचा समावेश असून, त्यांच्यासोबत एक कमांडर, दोन पीपीसीएम आणि एक एसीएम अशा एकूण ६ माओवादी सदस्यांनी शस्त्र खाली ठेवली. या सहाहींवर मिळून महाराष्ट्र शासनाने ६२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले होते.
यामध्ये –
- भिमन्ना ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे (डिव्हीसीएम, उत्तर बस्तर डिव्हिजन) – बक्षीस १६ लाख
- विमलक्का ऊर्फ शंकरअक्का सडमेक (डिव्हीसीएम, माड डिव्हिजन) – बक्षीस १६ लाख
- कविता ऊर्फ शांती मज्जी (कमांडर, पश्चिम ब्युरो टेलर टिम) – बक्षीस ८ लाख
- नागेश ऊर्फ आयताल माडवी (पीपीसीएम, कंपनी क्र. 10) – बक्षीस ८ लाख
- समीर आयतू पोटाम (पीपीसीएम, दक्षिण ब्युरो टेक्निकल टीम) – बक्षीस ८ लाख
- नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा मडावी (एसीएम, अहेरी दलम) – बक्षीस ६ लाख
यापैकी पती-पत्नी असलेल्या भिमन्ना–विमलक्का तसेच नागेश–कविता या जोडप्यांना आत्मसमर्पणानंतर शासनाकडून अतिरिक्त मदत मिळणार आहे.
—पुनर्वसन योजनांचा लाभ
शासनाच्या आत्मसमर्पण योजनेनुसार या सहाही माओवादी सदस्यांना केंद्र व राज्य शासनाकडून एकत्रितरित्या आर्थिक मदत मिळणार असून, त्यात भिमन्ना व विमलक्काला प्रत्येकी ८.५ लाख रुपये, कविताला ५.५ लाख, नागेशला ५ लाख, समीरला ४.५ लाख आणि नवाताला ४.५ लाख रुपये इतका लाभ देण्यात येणार आहे. तसेच पती-पत्नी व गटाने आत्मसमर्पण केल्यास मिळणारी अतिरिक्त मदतही त्यांना जाहीर झाली आहे.
–-गडचिरोली पोलिसांची मोठी कामगिरी
सन 2005 पासून सुरु झालेल्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत आजवर 716 माओवादी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण करुन मुख्य प्रवाहात दाखल झाले आहेत. फक्त चालू वर्ष 2025 मध्येच आजवर एकूण 40 माओवादींनी आत्मसमर्पण केले आहे.
याच पार्श्वभूमीवर यावर्षीच 1 जानेवारीला दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटी सदस्य ताराक्का सिडामसह 11 माओवादी, तर 6 जून रोजी डिव्हीसीएम सपनाक्का चौधरीसह 12 माओवादींनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते. आजचे आत्मसमर्पण हे त्या साखळीतील आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
–-पोलीस महासंचालकांचा दौरा आणि सत्कार सोहळा
गडचिरोलीत झालेल्या कार्यक्रमात यापूर्वीच्या चकमकींमध्ये यश मिळविणाऱ्या सी-60 चे अधिकारी व जवानांचा मा. रश्मि शुक्ला यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
27 ऑगस्ट रोजी कवंडे जंगलात 4 माओवादी ठार
27 ऑगस्ट रोजी कोपर्शी–फुलनार येथे 4 माओवादी ठार
17 सप्टेंबर रोजी मोडस्के जंगल परिसरात 3 माओवादी ठार
या तिन्ही मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जवानांना प्रशस्तिपत्र व सत्कार करण्यात आला. तसेच माओवादी हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांचे धनादेशही वितरित करण्यात आले.
त्यानंतर मा. पोलीस महासंचालकांनी अति-संवेदनशील कवंडे पोस्टेला भेट देऊन जवानांशी संवाद साधत त्यांच्या धाडसी कार्याची प्रशंसा केली.
—पोलीस महासंचालकांचे आवाहन
“उर्वरित माओवादींनी हिंसेचा त्याग करावा, शस्त्र खाली ठेवून लोकशाहीच्या प्रवाहात सामील व्हावे व सन्मानाने शांततेचे जीवन जगावे,” असे आवाहन रश्मि शुक्ला यांनी यावेळी केले.
— या आत्मसमर्पणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून, पोलीस दलाचे माओवादविरोधी अभियान आणखी गतीमान झाले आहे.