स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही सिरोंचा तालुका अंधारात : टॉवर लाईनची तातडीची गरज….

विशेष संपादकीय दिनांक:-17 ऑगस्ट 2025
१५ ऑगस्टसारखा ऐतिहासिक दिवस, देशभक्तीच्या भावनेने प्रत्येक गावागावात झेंडे फडकवले जातात, शाळा-महाविद्यालयांत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. मात्र या वर्षी सिरोंचा तालुक्याने वेदनादायी वास्तव अनुभवले – स्वातंत्र्यदिनीच तालुका अंधारात गेला! महावितरण आणि महापारेषणच्या निष्काळजी कारभारामुळे तब्बल २४ तास वीज पुरवठा खंडित राहिला. परिणामी नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण झाले, मोबाईल बंद पडले, पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली आणि स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रमच विस्कळीत झाले.
ही केवळ तांत्रिक बिघाडाची घटना नव्हे, तर व्यवस्थेतील दुर्लक्षाचा नमुना आहे. आलापल्ली–सिरोंचा ६६ केव्ही लाईन मागील पन्नास वर्षांपासून अस्तित्वात आहे. कालबाह्य झालेल्या या लाईनवरच संपूर्ण तालुक्याचा भार आहे. परिणामी, थोडासा वारा-पाऊस झाला की वीजपुरवठा खंडित होतो. ३० ते ४० किलोमीटरपर्यंतचा फॉल्ट शोधण्यात दोन दिवस लागतात, ही परिस्थिती नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारी आहे.
सिरोंच्यातील जनतेने अनेकदा निवेदने सादर केली, आंदोलने केली, चक्काजाम केला. तरीही महावितरण व महापारेषण विभाग केवळ फॉल्ट काढतोय या आश्वासनापलीकडे गेले नाही. नागरिकांच्या जीवनमानाशी थेट निगडीत असलेला प्रश्न असूनही आजवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही.
या पार्श्वभूमीवर टॉवर लाईन उभारणीची मागणी आता अपरिहार्य ठरली आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिक विकासाची गरज, शेतकऱ्यांचे सिंचन वीजेवरचे अवलंबित्व – या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ३३ केव्ही व ६६ केव्ही लाईनवर अवलंबून राहणे म्हणजे विकासाची पावले रोखणे होय. सिरोंच्यासारख्या दुर्गम भागात भविष्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन टॉवर लाईन आणि सबस्टेशनची उभारणी तातडीने होणे आवश्यक आहे.
आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही नागरिकांना अंधाराचे स्वातंत्र्य मिळत असेल, तर ही शोकांतिका आहे. महावितरण व महापारेषणच्या भोंगळ कारभारावर कठोर कारवाई करणे, तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करणे हेच शासनाचे कर्तव्य आहे. अन्यथा नागरिकांचा संताप आणखी तीव्र होईल आणि प्रशासनावरील विश्वास उणे होईल.
✍ संपादक – विदर्भ न्यूज 24
www.vidarbhanews24.com